परळी मल्टीस्टेटमध्ये राहुरीच्या ग्रामस्थांचे ८० लाख अडकले

विलास कुलकर्णी
Wednesday, 28 October 2020

देवळाली प्रवरा येथे परळी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेत ठेवीदार ग्रामस्थांचे 80 लाख रुपये अडकले. संस्थेची शाखा अनेक दिवसांपासून बंद आहे.

राहुरी (अहमदनगर) : देवळाली प्रवरा येथे परळी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेत ठेवीदार ग्रामस्थांचे 80 लाख रुपये अडकले. संस्थेची शाखा अनेक दिवसांपासून बंद आहे. वारंवार मागणी करूनही ठेवी परत मिळत नाहीत. त्यामुळे ठेवीदार धास्तावले आहेत. ठेवीदारांनी राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा तक्रार अर्ज दिला आहे. संस्थेचे विरुद्ध गुन्हा नोंदविला नाही. तर, तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.

मंगळवारी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समक्ष भेटून, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ काळे, आप्पासाहेब ढूस, अरुण ढूस, डॉ. सुधीर क्षीरसागर,  डॉ. विलास पाटील, ठेवीदार डॉ. नामदेव कडू,  सागर गडाख, मच्छिंद्र टेकाळे, रेवजी सांबरे, सुनील महाडिक, रमेश वाळके, किसन टिक्कल यांनी तक्रारीचे निवेदन दिले.

निवेदनात म्हंटले की, "देवळाली प्रवरा येथील परळी मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेत ठेवी ठेवल्या आहेत. होतो संस्थेची शाखा कित्येक दिवसांपासून बंद आहे. पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांना फोन करुन आमच्या ठेवी परत मिळण्यासाठी विनंती करीत आहे. परंतु, आम्हाला आमच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. पतसंस्था बंद असल्याने आमची फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी एप्रिल 2020 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही. गुन्हा नोंदविला नाही. त्यामुळे दुबार तक्रार देत आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला नाही. तर, ठेवीदारांतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल." असा इशारा देण्यात आला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 lakh villagers of Rahuri are stuck in Parli multistate