
तालुक्यातील बेलापूर खुर्द, टाकळीभान, पढेगाव, वडाळा महादेव, खोकर, गोंडेगाव परिसरात निवडणुकीची रनधुमाळी सुरु आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील विविध ठिकाणच्या 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शुक्रवारी (ता. 15) पार पडत आहे. 26 ग्रामपंचायतीमधील 266 सदस्यपदांसाठी सुमारे 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
तालुक्यातील बेलापूर खुर्द, टाकळीभान, पढेगाव, वडाळा महादेव, खोकर, गोंडेगाव परिसरात निवडणुकीची रनधुमाळी सुरु आहे. प्रत्येक गावपुढारी आणि सर्वच उमेदवार प्रचार कामात व्यस्त आहे. अनेक महिला उमेदवारांचे पतींची प्रचारासाठी दमछाक होत आहे. सर्वाधिक मतदान मिळविण्यासाठी दिवसरात्र मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहे. गावातील चौकासह विविध रस्त्यासमोर फलकबाजीचा जोर वाढत आहे. तालुक्यातील बेलापूरात येथे दोन नवले गटांमध्ये समोरासमोर थेट लढत होणार असून बेलापूरातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. तसेच टाकळीभान येथे समाजिक कार्यकर्ते कान्हा खंडागळे यांना मुरकुटे, ससाणे समर्थकांची साथ मिळाली असून त्यांची विखेपाटील समर्थक नानासाहेब पवार यांच्याशी समोरासमोर लढत सुरु आहे.
अनेक गावात विखे समर्थक आणि मुरकुटे समर्थक एकवटले असून तर काही गावामध्ये गटतटाचे राजकारण होणार आहे. कारेगाव येथे शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे आणि माजी सभापती दीपक पटारे यांच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाने उमेदवार मैदानात उतरविले आहे. प्रचारालाही चांगलाच वेग आल्याचे दिसते. खोकर, गोंडेगाव, वडाळा महादेव, एकलहरे, महांकाळवाडगाव, निपाणीवडगाव येथील राजकारण चांगलेच तापले आहे.
एकगठा मतदान मिळवण्यासाठी उमेदवारांकडून विशेष प्रयत्न सुरु आहे. गावातील रखडलेले कामे आणि ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था प्रचाराचा विषय बनला आहे. निवडणुकीत विजय होणे अनेक गावातील सत्ताधारी गटांसमोर मोठे आव्हान बनले आहे. विविध कामानिमित्त गावाबाहेर गेलेले मतदार मतदानाला गावी आणण्याचे नियोजन सुरु आहे.