नगरमध्ये २५ केंद्रावर झाली नीटची परीक्षा

दौलत झावरे
Sunday, 13 September 2020

परीक्षा हॉलमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फूट अंतर ठेवले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात विद्यार्थ्यांनी प्रथमच अशी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रात विद्यार्थी जाण्याअगोदर पालक त्यांच्यावर सूचनांचा भडिमार करताना दिसत होते. 

नगर ः जिल्ह्यातील 25 परीक्षा केंद्रांवर 9 हजार 170 परीक्षार्थींनी आज वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ("नीट') दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेबाबत "एनटीए'ने आवश्‍यक खबरदारी घेतली होती.

प्रत्येक विद्यार्थ्याला थर्मल स्कॅनिंग करून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांकडून, "कोरोनाबाधित नाही, तसेच कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलो नाही,' असे लिहून घेण्यात आले.

सकाळी साडेदहापासूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यास सुरवात झाली. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्यात आली. दुपारी तीनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यानंतर परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

परीक्षा हॉलमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फूट अंतर ठेवले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात विद्यार्थ्यांनी प्रथमच अशी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रात विद्यार्थी जाण्याअगोदर पालक त्यांच्यावर सूचनांचा भडिमार करताना दिसत होते. 

अशी घेतली खबरदारी 
प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांना मास्क, पेन, सॅनिटायझर व पिण्यासाठी पाणी पुरविण्यात आले. परीक्षा केंद्र परिसर सॅनिटाइझ केला होता. शरीराचे तापमान 34.4 अंशांपेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठकव्यवस्था केली होती. अशा परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांना पीपीई किट दिली होते. पर्यवेक्षक व प्रवेश प्रक्रियेतील शिक्षकांना मोबाईलच्या वापरास, तसेच काही खाण्यास बंदी घातली होती. 

परीक्षा संपल्यानंतर वाहतूक ठप्प 
कोरोनामुळे अनेकांनी खासगी वा भाडेतत्त्वावरील वाहनांद्वारे पाल्यांना आणले होते. त्यामुळे परीक्षा केंद्रापासून 200 मीटरच्या पुढे मोकळ्या जागेत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने परीक्षा केंद्रात प्रवेश दिला. त्यामुळे एका वेळी गर्दी झाली नाही. मात्र, परीक्षा संपल्यावर सर्वांना एकाच वेळी सोडल्याने परीक्षा केंद्र परिसरातील रस्त्यांवर व शहरात वाहतूककोंडी झाली. 

शेवगावात सर्वाधिक परीक्षार्थी 
शेवगाव : जिल्ह्यात सर्वाधिक 900 विद्यार्थ्यांसाठी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात सोय करण्यात आली होती. त्यांपैकी 770 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 130 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी 75 हॉलमध्ये प्रत्येकी 12 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था केली होती. केंद्राच्या परिसरात सकाळी नऊ वाजेपासून पालक- विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासकीय आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9000 students appeared for the exam at 25 centers in Ahmednagar