esakal | जिल्हा बॅंकेच्या शाखेस 25 हजारांचा दंड

बोलून बातमी शोधा

fine

पारनेर व भाळवणी येथील नियम मोडणाऱ्यांवरही तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

जिल्हा बॅंकेच्या शाखेस 25 हजारांचा दंड

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जिल्हा सहकारी बॅंकेत व एका कापड दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्याने प्रशासनाने बॅंकेस 25 हजारांचा व कापड दुकानास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या शिवाय पारनेर व भाळवणी येथील नियम मोडणाऱ्यांवरही तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

तालुक्‍यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी (ता.28)300 व्यक्ती बाधित आढळून आल्या. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असले, तरीही जनता अद्यापही जागी झाली नाही. बुधवारी महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत टाकळी ढोकेश्‍वर येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत 200 हून अधिक ग्राहकांनी एकाच वेळी गर्दी केली होती. त्यामुळे या शाखेस 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच तेथीलच एका कापड दुकानदारासही दुकान सुरू ठेवल्याने त्याला 10 हजार रुपयांचा दंड केला, अशी माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.

तालुक्‍यात पाच दिवस बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. कारखानदारांना कामगारांची सोय कारखान्यातच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे शक्‍य नसल्यास 10 टक्के कामगारांना बाहेरून ये-जा करण्यास परवानगी दिली आहे. या कामगारांची यादी कारखानदारांनी प्रशासनास देणे गरजेचे आहे.

- ज्योती देवरे, तहसीलदार