esakal | कोरोनाने आणली वाढदिवसालाच श्रद्धांजलीची वेळ

बोलून बातमी शोधा

A young man from Sonai died on his birthday
कोरोनाने आणली वाढदिवसालाच श्रद्धांजलीची वेळ!
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

सोनई (अहमदनगर) : कोरोना नेमके कसले दिवस दाखवतोय हे कळायला मार्ग नाही. वयस्कर लोकांसोबत तो तरूणांचाही बळी घेतोय. रात्री घडलेली घटना जिव्हाला चटका लावणारी आहे.

नगरमध्ये बेड नसल्याने औरंगाबादला घेवून जात असताना सोनई येथील युवकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यास श्रद्धांजली अर्पण करण्याचा बाका प्रसंग नातेवाईक व मित्र परिवारावर आला आहे.

राजस्थानी युवा मंचचा धडाडीचा कार्यकर्ता संकेत ओंकारलाल भळगट(वय-३३) असे युवकाचे नाव असून तो आई-वडिलांना एकुलता एक होता.सहा दिवसांपूर्वी त्याची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली होती. तो नगरला एका कोविड सेंटरला उपचार घेत होता. सोमवार(ता.१९ )च्या रात्री त्यास जास्त त्रास जाणवू लागला.

सामाजिक कामात होता अग्रेसर

परिवार व मित्रांनी खूप प्रयत्न करूनही रुग्णालयाचा बेड मिळाला नाही. औरंगाबादला नेताना रात्री एक वाजता त्याचे निधन झाले. मागील वर्षी कोरोना काळात त्याने गरजूंना किराणा साहित्य वाटप करणे, राजमार्गावर गरजूंना जेवणाचे डबे देणे, असे विधायक काम केले होते. मदतीसाठी त्याचा नेहमी पुढाकार असायचा.

सोमवारी रात्री बारानंतर त्यास अनेक मित्रांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ती शुभेच्छांची फुले श्रद्धांजली म्हणून ठरल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. संकेत यांच्या मागे आई, वडील, पत्नी व जीवा नावाची दोन वर्षाची मुलगी आहे.

बातमीदार - विनायक दरंदले