मुलीच्या लग्नासाठी खरेदीला जाताना आई- वडिलांचा मृत्यू... तिघे पोरके झालेल्यांचे स्विकारले पालकत्व

आनंद गायकवाड
Tuesday, 4 August 2020

मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या त्या कुटुंबातील मोठ्या मुलीचे लग्न जमल्याने परिवारात आनंदाचे वातावरण होते.

संगमनेर (अहमदनगर) : मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या त्या कुटुंबातील मोठ्या मुलीचे लग्न जमल्याने परिवारात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तयारी सुरू झाली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या तिच्या आई- वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे मुलांवर आभाळ कोसळले. 

पाथर्डी तालुक्‍यातील कळस पिंप्री येथील संजय गाडे यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीमुळे तीन मुले अनाथ झाली. या घटनेची माहिती समजताच आधार फाउंडेशनचे पाथर्डीतील समन्वयक विष्णू बढे यांनी त्यांची भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या. 

सरपंच बद्रिनाथ येंडे, माजी सरपंच भानुदास शेळके यांनी स्थानिक पातळीवर मदत करणार असल्याचे सांगितले. आई- वडिलांचे छत्र हरपल्याने या कुटुंबातील दहावीत शिकणारा मुलगा धनंजय व बारावीतील प्रतीक्षा यांचे शैक्षणिक पालकत्व "आधार'ने स्वीकारले. त्यांना किरकोळ खर्चासाठी तीन हजारांची मदत देण्यात आली. शालोपयोगी वह्या, पुस्तके, कपडे, चपला, सॅक आदींसह परीक्षा शुल्क, शैक्षणिक सहल आदी सर्व खर्च आधार फाउंडेशन करणार असल्याचे डॉ. महादेव अरगडे व विठ्ठल कडुसकर यांनी सांगितले. 

"आधार'चे सदस्य आप्पा दौंड, सुधाकर खेडकर उपस्थित होते. सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, अनिल कडलग, पी. डी. सोनवणे, बाळासाहेब पिंगळे, लक्ष्मण कोते, ललिता दिघे आदी या उपक्रमासाठी प्रयत्नशील आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar Foundation help three children from Kalas Pimpri in Pathardi taluka