मुख्यमंत्र्याच्या सचिवपदाचा बहुमान संगमनेरच्या भूमिपुत्राला

आनंद गायकवाड 
Thursday, 21 January 2021

याशिवाय तेथील उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करुन दिली होती. या व्यतिरिक्त मोगरा व सोनचाफा या फुलांच्या लागवडीलाही प्राधान्य दिले होते.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील शेतकरी कुटूंबातील सनदी अधिकारी आबासाहेब एकनाथराव जऱ्हाड पाटील यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्त होण्याचा मान तिसऱ्यांदा मिळवणारे ते एकमात्र सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या या नियुक्तीचा आनंद त्यांच्या मूळगावी जल्लोष करुन साजरा करण्यात आला.

वडिलांच्या प्रोत्साहनामुळे शिक्षणाला महत्व देत आयएएस दर्जा मिळवणारे आबासाहेब जऱ्हाड सामान्य शेतकरी कुटूंबातील आहेत. ते 1997 च्या बॅचमधील सनदी अधिकारी म्हणून प्रशासकिय सेवेत रुजू झाले होते. यापूर्वी त्यांनी विक्रीकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त, तसेच मुख्यमंत्र्यांचे उपसचिव पदावर उल्लेखनीय काम केलेले आहे. राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ व दुर्गम आदिवासी तालुक्यांची मोठी संख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाची कारकिर्द विशेष उल्लेखनिय ठरली आहे. या कार्यकाळात त्यांनी तेथील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करीत, आदिवासी समाजाला स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्य़ा सबल बनविण्यासाठी हळदीच्या शेतीला प्राधान्य दिले. 

याशिवाय तेथील उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करुन दिली होती. या व्यतिरिक्त मोगरा व सोनचाफा या फुलांच्या लागवडीलाही प्राधान्य दिले होते. या लक्षणीय कामगिरीमुळे त्यांना पिवळ्या क्रांतीचे जनक म्हटले जाते. या उल्लेखनिय कामाची दखल घेत त्यांना 2011-12 च्या बेस्ट कलेक्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. तसेच नागरिकांचे श्रम व वेळ वाचवताना एकाच खिडकीवर विविध दाखले मिळवून देणारा सेतू हा उपक्रम शासनाच्या इंद्रधनू योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात राबविला गेला. त्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त तसेच राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच नारायण राणे यांचे सचिव म्हणून प्रशासकिय कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या आबासाहेब जऱ्हाड यांना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव म्हणून काम करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abasaheb Eknathrao Jarhad Patil has been appointed as Secretary to Chief Minister Uddhav Thackeray