
एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या नेत्याला राजकीय जीवनात उभं करण्यात यशवंतराव चव्हाणांसोबतच नगरच्या नेत्याचा मोलाचा वाटा आहे. दस्तुरखुद्द शरद पवार हेच कित्येकदा ती आठवण सांगतात.
अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, धुरंधर राजकीय नेता, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, उत्तम वाचक, प्रचंड स्मरणशक्ती असलेला माणूस, कमालीचे कष्टाळू अशा किती तरी नावाने शरद पवार यांना ओळखलं जाते. किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख आला तरी लोकांना त्यांचे किती तरी रोल आठवतात. एवढी अचाट ताकद या नेत्यामध्ये आहे.
साहेब राजकारणापलिकडही नातं जपतात म्हणूनच तर त्यांच्यावर कार्यकर्त्यांची गाढ श्रद्धा आहे. राजकारणात ध्रुवपद कधी नसतंच परंतु शरद पवार यांनी आपल्या हिंमतीने ते निर्माण केलंय. एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या नेत्याला राजकीय जीवनात उभं करण्यात यशवंतराव चव्हाणांसोबतच नगरच्या नेत्याचा मोलाचा वाटा आहे. दस्तुरखुद्द शरद पवार हेच कित्येकदा ती आठवण सांगतात.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रचाराच्या सभेतच माजी मंत्री कै. आबासाहेब निंबाळकर यांच्याविषयीची ती आठवण साहेबांनी सांगितली होती. त्या काळात आबासाहेबांचा राज्याच्या काँग्रेसमध्ये मोठा प्रभाव होता. पवार हे पुण्यात युवक काँग्रेसचे काम करीत होते. त्यांना बारामती येथे काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची होती. परंतु तेथील प्रभावशाली असलेल्या विरोधकांमुळे ते जमत नव्हतं.
पवार यांनी ही अडचण आबासाहेबांना बोलून दाखवली. त्या वेळी आबासाहेबांनी बारामतीत युवक काँग्रेसचा मेळावा घेण्याची सूचना केली. त्यासाठी लागणारी सगळी रसद पुरविण्याचाही शब्द दिला. तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्षांसह स्वतः तेथे उपस्थित राहून मेळावा यशस्वी करून दिला. त्यामुळे राज्यात वेगळा मेसेज गेला. पवार साहेबांच्या जीवनातील हा पहिलाच मेळावा होता. याचे सर्व श्रेय ते आबासाहेबांना देतात.
पवार हे आबासाहेबांना गुरूस्थानीच मानतात. राजकीय जीवनाच्या प्रारंभी आबासाहेबांनी त्यांना नेहमीच मदत केली. उभयतांमध्ये केवळ राजकीयच नाते नव्हते, तर त्यांच्या कौटुंबिक सलोखाही होता. आबासाहेबांच्या मूळ गावी कर्जत तालुक्यातील दिघी येथे पवार वारंवार येऊन राजकीय सल्ला घेत. त्यांच्या नगरच्या लाटे गल्लीतील वाड्यावर व यशवंत कॉलनीतील बंगल्यावर ते येत. आजारपणाच्या काळातही नगरला येत आस्थेने विचारपूस करीत.
आबासाहेब गेले तेव्हा पवार हे जर्मनीत होते. दशक्रियाविधीला आवर्जून उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळीही पवार यांनी आपल्या राजकीय जीवनातील आबासाहेबांचे महत्त्व अधोरेखित केलं होतं.
आबासाहेबांचे चिरंजीव राजेंद्र निंबाळकर पवारसाहेबांविषयी आठवण सांगतात, "एकदा पवारसाहेबांची कर्जत-जामखेडचे काँग्रेस उमेदवार निकाळजे गुरूजी यांच्या प्रचारार्थ सभा होती. त्यांना नगरला यायला उशिर झाला. त्या अगोदर वांबोरी, श्रीरामपूरला सभा होत्या. पवार साहेब आबासाहेबांच्या गाडीत बसले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघही होते. मी स्वतः गाडी चालवित होतो. रस्त्यात खड्डे असल्याने जायला उशिर लागत होता. मी जरा वेग वाढवला आणि एका खड्ड्यात गाडी आदळली आणि साहेबांचे डोके छताला लागलं. मी खूप घाबरलो. परंतु त्यावेळी साहेबांनी मला धीर दिला. "मला काहीही झालं नाही. आत्ता मला समजलं की वाघ यांना लोकांनी राहुरीतून का पाडलं ते..." या वाक्यावर रामनाथ अण्णांसह सगळेच हसायला लागले. त्या कठीण प्रसंगातही साहेबांनी अशी मिश्किली केल्याचे मला आठवते."
"त्या निवडणुकीत वांबोरी चारीचा प्रश्न गाजत होता. सभास्थानी काळे झेंडे घेऊन लोक उभे होते. सर्वांनीच वांबोरी चारीचा उल्लेख सभेत करू नका, असा सल्ला दिला होता. परंतु सभेत साहेबांनी त्याच विषयाने सुरूवात केली. "मी मुख्यमंत्री असताना फेरसर्वे करण्याचा आदेश दिला की नाही. त्यानुसार सर्वे सुरू झाला की नाही...लोकांनीच टाळ्या वाजवित सांगितलं हो.. मग म्हणाले ,काम मार्गी लागणार." साहेबांनी ती सभा एका वाक्यात फिरवून टाकली होती. त्या प्रवासात साहेब मला म्हणाले, तू गाडी चावलून कंटाळला असशील, मी चालवतो, तू बस मागे. अर्थात मी काही त्यांंना गाडी चालवू दिली नाही. परंतु त्यांच्या या आस्थेचे शब्द मला आजही स्पष्टपणे आठवतात."
दुसरा किस्सा असा की, "आबासाहेब कामानिमित्त मुंबईला निघाल होते. खंडाळा घाटातील एका हॉटेलवर सर्व राजकीय नेते नाष्ट्याला थांबत. तेथे पवार साहेबही थांबले होते. मुंबईकडे जाताना पवार साहेब स्वतः आबासाहेबांचे वाहन चालवू लागले. काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. आबासाहेब त्यांना म्हणाले, तुम्हाला लागलं तर नाही ना, गाडीचं काय व्हायचं ते होऊ द्या. दोघांमध्ये असं जिव्हाळ्याचं नातं होतं."
त्यांच्याविषयी अशा कितीतरी आठवणी आणि किस्से आमच्या कुटुंबाकडे आहेत. पवारसाहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो, हीच देवाकडे त्यांच्या वाढदिवशी प्रार्थना करतो.