नोकरदारांसाठी जिल्हा बँकेकडून वैयक्तिक गृहकर्जासह आता अपघात विमा पॉलिसी

अमित आवारी
Saturday, 24 October 2020

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदारांसाठी बॅंकेने वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदारांसाठी बॅंकेने वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय झाला, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी दिली. 

जिल्हा बॅंकेत शासकीय, निमशासकीय पगारदार नोकरांची मोठ्या प्रमाणावर पगाराची खाती आहेत. या खातेदारांना बॅंकेमार्फत वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. याबाबत लवकरच विमा कंपन्यांशी चर्चा करून या खातेदारांना विमा पॉलिसी लागू करणार आहे. पगारदार नोकरांसाठी वैयक्तिक गृहकर्ज योजनेंतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत 25 लाख रुपये व मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत 15 लाखांपर्यंतचे कर्ज बॅंकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

त्यांना व्यक्तिगत वापरासाठी दुचाकी व चारचाकी वाहन कर्जही बॅंकेकडून उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती गायकर यांनी दिली. गृहकर्ज, वाहनकर्ज या वैयक्तिक कर्जांचा लाभ नोकरदारांनी घेण्याचे आवाहन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident insurance policy now with personal home loan from Nagar district bank for employees