
या अपघातात मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या डोक्याला व कपाळाला जखम झाली असून उपजिल्हाधिकारी यांना मात्र किरकोळ मार लागला आहे.
पारनेर (अहमदनगर) : नगर-कल्याण महामार्गावर आज मंगळवार (ता.19 ) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार व जेसीबी यांच्यात झालेल्या धडकेत नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र क्षीरसागर डोक्याला मार लागल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्या समवेत प्रवास करत असलेले उप जिल्हाधिकारी संदीप निचीत मात्र किरकोळ जखमी झाले आहेत.
आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर व उपजिल्हाधिकारी निचीत हे नगरहून संगमनेरकडे जात असताना नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला. हे दोघे कार (क्र.एमएच.12जेएम.6551 ) ने संगमनेर येथे जात होते. ते नांदूर फाटा येथे आले असताना पारनेर व जुन्नर हद्दीच्या सिमेवर नांदूर फाटा येथे नांदूरकडून येणा-या जेसीबीने त्यांच्या कारला धडक दिली.
या अपघातात मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या डोक्याला व कपाळाला जखम झाली असून उपजिल्हाधिकारी यांना मात्र किरकोळ मार लागला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी आळेफटा येथील खाजगी माऊली हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठिक असून उपजिल्हाधिकारी निचीत यांना काही झालेले नाही, अशी माहिती पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे व गटविकास अधिकारी के पी माने यांनी दिली.