मनाला चटका लावणारा अपघात; पोलिस पाटलाचा जागीच मृत्यू

शांताराम काळे 
Wednesday, 16 September 2020

कोल्हार घोटी रस्त्यावर दुचाकीवरून राजूरकडे येत असताना समोरून येणाऱ्या पिकअपने अक्षरशा उडविले. 

अकोले (अहमदनगर) : कोल्हार घोटी रस्त्यावर दुचाकीवरून राजूरकडे येत असताना समोरून येणाऱ्या पिकअपने अक्षरशा उडविले. त्यात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना संगमनेर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी नातेवाईकांवर दबाव आणला जात असल्याचे समजले आहे. वाहनचालक कोण आहे याबाबतही उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

फिर्यादी महादू मंगा करवर यांनी राजूर पोलिसांना दिलेली माहिती अशी की, बाभूळवंडी (ता. अकोले) येथील पोलिस पाटील धोंडिबा मंगा करवर (वय ५५) व ढवळा बहिरू लेंडे (वय ४५) हे दुचाकीवरुन येत होते. तेव्हा चालक विकास चंद्रकांत चोथवे (रा. राजूर) हा पिकअपघेऊन विरुद्ध दिशेने जात होते. तेव्हा समोरुन येणाऱ्या दुचाकीला त्यांनी जोराची धडक दिली. त्यात पोलिस पाटील धोंडिबा मंगा करवर यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेले ढवळा बहिरू लेंडे हे गंभीर जखमी झाले. याचा सहपोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉस्टीबल कैलास शेळके तपास करीत आहेत. मात्र घटना सोमवारी घडूनही बुधवारी सकाळपासून पोलिस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर एका राजकीय नेत्याचा पोलिसांना फोन झाल्याची चर्चा त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी घटना घडूनही या प्रकरणाचा तपास बुधवारपर्यंत सुरूच होता. पोलिस स्टेशनबाहेर तडजोडीसाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. याशिवाय अशी गंभीर घटना घडूनही वरिष्ठ अधिकारी याकडे फिरकले नाहीत. तर पोलिस विभागाशी संबंधित असलेला व्यक्तीचे म्हणजे पोलिस पाटलाचा मृत्यू होऊनही काहीच कारवाई होत नाही. तर पुढारी देखील हस्तक्षेप करीत असल्याने हे कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय याबाबत घटनेत बदल केला असला तरी सीसीटिव्ही फुटज हा मोठा पुरावा आहे. याची चौकशी होण्याची मागणी होऊ लागली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of police patil at Babhulwadi in Akole taluka