राजूर- कोल्हार घोटी रस्त्यावर खड्डेच खड्डे; अपघाताला आमंत्रण

शांताराम काळे 
Wednesday, 7 October 2020

राजूर येथील सार्वजनिक बांधकाम खाते झोपलेले दिसत आहे. साधे खड्डे बुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसत नाही.

अकोले (अहमदनगर) : राजूर कोल्हार घोटी रस्त्यावर मोठी खड्डे पडले असून ठेकेदार नवीन कामाच्या नादात खड्डे बुजविण्याचे सोडून पाईप लाईन उध्वस्त करत आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. विश्राम गृह ते स्मशानभूमी कॉंक्रीटीकरण होणे आवश्यक होते. मात्र संबधित ठेकेदाराने पेट्रोल पंपपर्यंत कॉंक्रीटीकरण करून पुढील काम केले नाही. त्यामुळे या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. मोटरसायकल चालक अपघात होऊन जखमी झाले आहेत. 

न्यायालयाने खड्डे असेल तर संबधित विभागाला जबाबदार धरून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मात्र राजूर येथील सार्वजनिक बांधकाम खाते झोपलेले दिसत आहे. साधे खड्डे बुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसत नाही. उपअभियंता तर नाशिकमध्ये बसूनच आपले कार्यालय चालवतात. तर महात्मांना ही विसरले आहेत. तर ठेकेदार हम करोसे... काम करत आहे. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करूनही नवीन झाडे अद्याप लावली गेली नाहीत. शिवाय जी लावली तीही सुरक्षित नसल्याने ती झाडे लोकांनी उपटून नेली तर काही झाडे मोकाट जनावरांनी खाऊन टाकली आहे. 

शहरातील रस्त्यावर साधे काम सुरु आहे. त्यात धोक्याच्या सूचना माहिती नाही. तर तिथे संरक्षण कठडे नाहीत व साईड गटारी नाही. त्यामुळे आंधळे दळते कुत्र पीठ खाते, अशी अवस्था आहे. मात्र त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. जर दोन दिवसात खड्डे बुजवले नाही तर खड्यामध्ये वृक्षारोपण आणि अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जाईल, असे प्रवासी संघटनेने सांगितले आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidents are happening due to big potholes on Rajur Kolhar Ghoti road