नगरचे गुरूजी कंटाळले बदनामीला, बँकेला कोणी नाहक नावं ठेवली तर गुन्हाच

दौलत झावरे
Tuesday, 1 September 2020

बॅंकेच्या कारभारावर आरोप करणाऱ्यांवर संचालक मंडळाने कारवाई करण्याचा विचार केल्यामुळे शिक्षकांमध्ये याची चांगलीच चर्चा आहे. संचालक मंडळाने असा प्रकार करू नये, म्हणून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही काहींनी सुरू केला आहे. आरोप करणाऱ्यांवर कारवाई केल्यास त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटू शकतात.

नगर ः जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक बॅंकेच्या संचालकांनी बॅंकेची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तशी चर्चा झाली. 

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक नुकतीच झाली. बॅंकेच्या दैनंदिन व इतर कामकाजाचा आढावा तीत घेण्यात आला. 
प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून सध्या बॅंकेच्या कारभाराबाबत आरोप-प्रत्यारोप केले जात असून, अनेकांनी कारभाराबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारअर्ज दिले आहेत.

बॅंकेचा कारभार सुरळीत व व्यवस्थित सुरू असतानाही काही जणांकडून बॅंकेची विनाकारण बदनामी केली जात आहे. त्यामुळे बॅंकेची समाजातील प्रतिमा मलिन होत आहे. बॅंक व्यवस्थापन व संचालक मंडळावर बेताल आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी, असा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर चर्चा करून संचालक मंडळाने, बॅंकेची बदनामी करणाऱ्या शिक्षक सभासदांवर कारवाई करण्यासाठी त्यांना नोटीस पाठविण्यासंदर्भात चर्चा झाली; मात्र त्यावर ठोस निर्णय झाला नाही. 

दरम्यान, बॅंकेच्या कारभारावर आरोप करणाऱ्यांवर संचालक मंडळाने कारवाई करण्याचा विचार केल्यामुळे शिक्षकांमध्ये याची चांगलीच चर्चा आहे. संचालक मंडळाने असा प्रकार करू नये, म्हणून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही काहींनी सुरू केला आहे. आरोप करणाऱ्यांवर कारवाई केल्यास त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटू शकतात. त्यामुळे संचालक मंडळाने असे पाऊल उचलू नये व समाजात शिक्षकांची प्रतिमा आणखी मलिन करू नये, अशी अपेक्षा आता शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. 

बॅंकेची बदनामी करणाऱ्यांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यावर सर्व संचालकांची व आरोपांची पडताळणी करून निर्णय घेण्यात येणार आहे. 
- शरद सुद्रिक, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बॅंक 

संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बॅंकेची बदनामी करणाऱ्यांना नोटिसा पाठविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. 
- दिलीप मुरदारे, व्यवस्थापक, प्राथमिक शिक्षक बॅंक , अहमदनगर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against defaulters of primary bank