
म्हसे येथील माळवाडी परिसरातील घोड नदीपात्रात सुरू असलेल्या वाळूचोरीवर कारवाई करत तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी भल्या पहाटे चार बोटी फोडल्या.
श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यातील म्हसे येथील माळवाडी परिसरातील घोड नदीपात्रात सुरू असलेल्या वाळूचोरीवर कारवाई करत तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी भल्या पहाटे चार बोटी फोडल्या. वाळूवाहतूक करणारा एक मालट्रकही पकडला. या कारवाईत वाळूचोरांचे पन्नास लाखांचे नुकसान झाले.
शिरूर-श्रीगोंदे हद्दीवरील घोड नदीपात्रात अनेक महिन्यांपासून वाळूचोरी सुरू होती. शिरूरचे तहसीलदार व बेलवंडी पोलिसांनी काही वेळा या वाळूचोरांविरुद्ध थेट कारवाई केली. मात्र, तेथील वाळूचोर सरकारी यंत्रणेला खिशात ठेवून फिरत असल्याचे चित्र होते. श्रीगोंद्याचे तहसीलदार पवार यांनी त्या भागातील वाळूचोरांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती; मात्र या कारवाईला मुहूर्त मिळत नव्हता. पवार यांनी मध्यंतरी तेथील परिसराची पाहणीही केली होती. आजच्या कारवाईत तहसीलदार पवार यांनी बेलवंडी पोलिसांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याची चर्चा आहे. कारवाईची बातमी "लीक' होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, तहसीलदारांनी महसूलचे तीन मंडलाधिकारी व दोन तलाठ्यांसह चार बोटींवर कारवाई केली. तेथील लोक नदीत उड्या मारून पसार झाले. महसूलच्या पथकाने बोटी स्फोटकांनी उडवून दिल्या. त्याच वेळी तेथे वाळू भरणारा एक मालट्रक आढळला. तो ताब्यात घेऊन बेलवंडी पोलिस ठाण्यात लावण्यात आला.
म्हसे येथील आजची कारवाई फत्ते झाली. आता भीमा नदीपात्रात सुरू असलेली वाळूचोरी कायमची बंद करण्यासाठी मोहीम राबविणार आहोत.
- प्रदीपकुमार पवार, तहसीलदार, श्रीगोंदे
संपादन : अशोक मुरुमकर