नगरमध्ये ऐन दिवाळीत बाजारातील अतिक्रमणांवर कारवाई

अमित आवारी
Tuesday, 10 November 2020

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. नागरिकांची रस्त्यावरील वाहने व फेरीवाल्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने बाजारपेठेत मोठी कोंडी होत होती.

नगर ः दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत अतिक्रमणे वाढली होती. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याची बातमी आज "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने आज बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरवात केली. मात्र, पथकाकडे मोठे वाहन नसल्याने कारवाईला मर्यादा येत होत्या. 

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. नागरिकांची रस्त्यावरील वाहने व फेरीवाल्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने बाजारपेठेत मोठी कोंडी होत होती. ही बाब आज "सकाळ'ने समोर आणली. त्याची दखल घेत, महापालिका व पोलिस प्रशासनाने आजपासून अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.

पथकाने आज सकाळी 10 वाजेपासूनच कारवाईला सुरवात केली. शहर अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमणविरोधी विभागाचे क्षेत्रिय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव, सुरेश मिसाळ, पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदींचा पथकात समावेश होता. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे 20 कर्मचारी, तर 25 पोलिस कारवाईत सहभागी झाले होते. भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक, कापडबाजार, घासगल्ली, गंजबाजार, मोची गल्ली परिसरात या पथकाने कारवाई केली.

पथक पाहताच फेरीवाल्यांची पळापळ सुरू झाली. आजच्या कारवाईमुळे बाजारपेठेतील काही रस्ते प्रशस्त झाले होते. 
दरम्यान, या कारवाईसाठी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडे मोठे वाहनच नव्हते. त्यामुळे पथकाने जप्त केलेल्या हातगाड्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीत ठेवल्या. नेहमीप्रमाणे मोठी कारवाई हे पथक करू शकले नाही. पोलिस पथकाने बेकायदेशीर वाहनांवरही कारवाई केली. 

नवीन वाहन खरेदीस विलंब 
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडे 1998-99सालचे मोठे वाहन होते. वाहनाची आयुमर्यादा संपल्याने दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेने त्याचा लिलाव केला. नवीन वाहन खरेदीसंदर्भात अतिक्रमणविरोधी पथकाने मागणी केली आहे. मात्र, नवीन वाहन खरेदी केलेले नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on encroachments on Ain Diwali market in Ahmednagar