शेड उभारल्याने गेलं नगरसेवकपद, जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

संजय आ. काटे
Monday, 12 October 2020

दरम्यान, या नोटिशीचा आधारे शेख यांनी नगरविकास खात्याकडे खेंडके यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यावर नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला. आजच्या सुनावणीत शेख यांची मागणी मान्य करीत, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी खेंडके यांना नगरसेवक म्हणून अपात्र घोषीत केले. 

श्रीगोंदे : पालिका हद्दीत विनापरवाना शेड उभारुन व्यवसाय केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशोक ऊर्फ आसाराम खेंडके यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज अपात्र ठरविले. 

खेंडके यांच्याविरुद्ध निवडणूक लढलेले राष्ट्रवादीचे उमेदवार अख्तर शेख यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे याचिका केली होती. तसेच पालिका प्रशासनाकडेही तक्रार केली होती. तीत अशोक व विनोद खेंडके या बंधूंनी लिंपणगाव रस्त्यालगत शहर हद्दीत शेड उभारून व्यवसाय सुरू केला. त्यासाठी पालिकेची परवानगी घेतली नाही. ही जागा येणे केलेली नसल्याने, खेंडके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने खेंडके यांना नोटीस बजावली. 

दरम्यान, या नोटिशीचा आधारे शेख यांनी नगरविकास खात्याकडे खेंडके यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यावर नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला. आजच्या सुनावणीत शेख यांची मागणी मान्य करीत, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी खेंडके यांना नगरसेवक म्हणून अपात्र घोषीत केले. 

या बाबत खेंडके म्हणाले, की हा निर्णय अन्यायकारक आहे. मी कुठलेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. या निर्णयाविरुद्ध योग्य ठिकाणी अपिल करणार आहे. निवडणुकीत नागरिकांनी नाकारलेल्या लोकांचे कारस्थान सफल होऊ देणार नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken against corporator for erecting unauthorized shed