उशिराने गुन्हे दाखल झाल्यास होणार कारवाई : पोलिस अधीक्षक मनोज पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

जिल्ह्यात आता सोलापूरप्रमाणेच उशिरा गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

अहमदनगर : जिल्ह्यात आता सोलापूरप्रमाणेच उशिरा गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात काही अपवादात्मक गुन्हे सोडल्यास सर्व गुन्हे लवकर दाखल व्हावेत, असे आदेश काढले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, उशिरा गुन्हे दाखल झाल्यास संबंधितांची चौकशी पोलिस उपअधीक्षक स्थरावर होईल. त्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे येईल. पुढील तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मी सोलापूर जिल्ह्यात असताना सुमारे 150 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढेल. यातून आगामी दोन वर्षांत गुन्हेगारी प्रवृत्ती आटोक्‍यात येण्यास मदत होईल. 

डिझेल प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. लवकर आरोपीला अटक होईल. या प्रकरणातील आरोपी फरार कसे झाले याचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अवैध व्यवसायिकांशी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने संबंध ठेवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

शहर वाहतूकसाठी अनुभवी व्यक्‍ती 
शहराची माहिती असलेल्या अनुभवी व्यक्‍तीला शहरातील वाहतूक शाखेचा कारभार सोपविण्यात येईल. या कामासाठी चांगल्या अनुभवी व्यक्‍तीची गरज असते. दिवाळीत शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी शहर वाहतूक शाखेचा कारभार प्रभारी व्यक्‍तीकडे लवकरच सोपविला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken if the case is filed late