
आमदार नीलेश लंके यांनी सर्वात आधी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यांच्या घोषणेला यश आले नाही.
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्या ग्रामविकासाचा झेंडा सातासमुद्रापार लागला आहे. त्यांच्या कामामुळे अनेक ग्रामपंचायतीने विकासाची वाट धरली. मात्र, याच ग्रामपंचायतीत आता निवडणुकीच्या निमित्ताने गावगुंडी सुरू झाली आहे. दोन्ही आदर्श गावांमध्ये दुफळी (दोन पॅनल) पडली. या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीची (ता. पारनेर) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. तेथे दोन जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी इतर सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
आमदार नीलेश लंके यांनी सर्वात आधी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यांच्या घोषणेला यश आले नाही.
हेही वाचा - आदर्श गाव हिवरे बाजारमध्येही पेटला रणसंग्राम
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हजारे यांनी अनेकदा प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राळेगणसिद्धी येथे यापूर्वी अनेक वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा होती. मात्र, मागील वर्षी निवडणूक झाली.
या वर्षी नऊ पैकी दोनच जागा बिनविरोध होऊ शकल्या. तेथे अनिल नामदेव मापारी व स्नेहल महेश फटांगरे यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांच्या निवडीची औपचारिकताच बाकी आहे. मात्र, इतर सात जागांसाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी आमदार लंके यांनी प्रयत्न केले. बिनविरोध निवड होणाऱ्या गावांना बक्षिसे जाहीर केली. राळेगणसिद्धी येथील इच्छुकांची बैठक घेऊन दोन गटांत जागावाटपही केले.
ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचेही जाहीर करून टाकले. असे असताना, नंतर मात्र इच्छुकांनी अर्ज दाखल केले. आज अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले जाऊन ही ग्रामपंचायत बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र, कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर अण्णांच्या गावातही आता ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम पेटणार आहे. निवडणूक बिनविरोध झाली नसली तरी अण्णांसोबत पोपटराव पवारही लोकशाही मानणारे आहेत. त्यामुळे ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर