आमदार विखे पाटलांच्या सुचनेनंतरच प्रशासनाला जाग

सुहास वैद्य
Tuesday, 15 September 2020

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोल्हार राजुरी रस्त्या लगतच्या चराच्या खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रश्नात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे.

कोल्हार (अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोल्हार राजुरी रस्त्या लगतच्या चराच्या खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रश्नात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे. तोपर्यंत या परिसरातील शेतजमिनी, अंतर्गत रस्ते व नागरी वसाहतींचे काही नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण होणारा हा प्रश्न दरवर्षीचाच आहे.

तीन वर्षापूर्वी विखे पाटील यांनी यात असेच लक्ष घातले होते. तसेच चराच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या होत्या. त्यावेळी कमी पावसाचा अपवाद वगळता या भागाचा पावसाच्या पाण्याच्या अडलेला प्रवाह शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असतो. 

गेल्या आठवड्यात तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पुन्हा विखे पाटील यांना साकडे घातले. त्याची दखल घेत त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पहाणी केली. वाड्यावस्त्यावरील ओढे नाले चर बुजविले गेल्याने शेतातील पावसाच्या पाण्याची विल्हेवाट रोखली.  हे चर उकरून आवश्यक त्याठिकाणी नळ्या टाकण्याचे तसेच कमी व्यासाच्या नळ्या असलेल्या ठिकाणी मोठ्ठ्या आकाराच्या नळ्या टाकण्याचे काम त्वरित सुरु करावे. सार्वजनिक विषयात गावकऱ्यांनी सहकार्य करावे. अशी अपेक्षा व्यक्त करतानाच चर उकरताना जे कोणी आडवे येतील, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना विखे पाटील यांनी राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. आर. वर्पे यांना दिल्या.

केवळ राजुरी रस्त्याचेच नव्हे तर बनकर फाटा व तिसगाव रस्ताच्याही शेताकडील बुजविलेले चर साईड गटारे उकरून काढावीत. चर उकरण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने तत्काळ सुरु करावे. पाण्याचा अडलेला नैसर्गिक प्रवाह मोकळा करून पाणी प्रवरा नदीला जाईल याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने उपाय योजना करावी, अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसानग्रस्त भागाच्या पहाणी दरम्यान उपस्थित शेतकरी व गावकऱ्यांनी त्यांच्या पुढे दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येविषयी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या. त्याची विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. चराच्या खोदाईला सुरवात झाली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोकळा झाल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होवू शकते.

शेतातील पाणी वाहून जाऊ लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करू लागले आहेत. 
अतिक्रमित चरामुळे ज्यांचे नुकसान झाले फक्त तेच लोक स्वत: उभे राहून चराची खोदाई करून घेत असल्याचे चित्र त्याठिकाणी दिसत होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील पहाणी करायला आल्यावर ज्या पुढारी मंडळीची त्यांच्याजवळ जाण्यासाठी धडपड सुरु होती. त्यापैकी एखादा दुसरा अपवाद वगळता खोदाईच्या कामाकडे कोणीही ढुंकून बघितले नाही. याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration did the work only after the suggestion of MLA Radhakrishna Vikhe Patil