वाळू उपशाला प्रशासन मदत करतंय, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

संजय आ. काटे
Tuesday, 29 September 2020

अंदाजे 30 ते 35 हैड्रोलीक बोटींच्या माध्यमातून हा उपसा होत असून दररोज 100 ते 150 वाळूच्या ट्रकांची या ठिकाणावरून अवैधरीत्या वाहतूक होत आहे.

श्रीगोंदे : तालुक्यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावातील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाला प्रशासनाचे पाठबळ असून हा वाळू उपसा न थांबल्यास श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अतुल लोखंडे यांनी दिला. 

लोखंडे म्हणाले, सध्या कोरोना महामारीचे आर्थिक संकट असताना मात्र वाळूमाफीया या संधीची चांदी करत आहेत. 
माठ, म्हसे व परीसरातील गावातून प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करीत आहे. अंदाजे 30 ते 35 हैड्रोलीक बोटींच्या माध्यमातून हा उपसा होत असून दररोज 100 ते 150 वाळूच्या ट्रकांची या ठिकाणावरून अवैधरीत्या वाहतूक होत आहे.

या अवजड वाहतुकीमुळे या दोन गावांबरोबरच शेजारील राजापूर, हिंगणी, पिंपरी कोलंदर, ढवळगाव, देवदैठण, बेलवंडी फाटा या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून दुर्दशा झालेली आहे. यासाठी काही टोळ्या तयार झालेल्या असून त्या स्वतःची मक्तेदरी असल्यासारखे प्रत्येक वाहन चालकाकडून तीन ते पाच हजाराप्रमाणे रुपये या प्रमाणे दररोज अवैधरित्या गोळा करतात.

या सर्व कामकाजा साठी या दोन्ही गावात बाहेर गावची जवळ जवळ 50 मुले त्या ठिकाणी नेमलेली असून त्यांच्या माध्यमातून ही अवैध वसुली केली जाते. यासाठी स्थानिक तरुणांचेही सहकार्य लाभत असल्याने परीसरातील बहुतांशी गावातील तरुण पिढी यामुळे व्यसनाधीन व गुंड प्रवृत्तीची बनली आहे.

दिवसाढवळ्या कुणालाही न भिता अगदी राजरोसपणे ही वसुली चालत असेल तर याला प्रशासन पाठिंबा तर देत नाही ना! अशी शंका उपस्थित होत आहे. वाळूमाफिया स्थानिक तरूणांसह जमावाने फिरत असल्याने या दोन्ही गावांसह परीसरातील गावातील सुजाण नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

शेजारील शिरूर ( जि. पुणे ) येथील महिला तहसीलदार यांना याची जाणीव होताच त्यांनी आपली हद्द सोडून अगदी बेधडकपणे या भागात येऊन कार्यवाही केली मात्र श्रीगोंदे तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासन बघ्यांची भूमिका घेताना दिसत आहे.
जर हे वेळीच थांबलं नाही तर भविष्यात या ठिकाणी टोळी युद्ध होऊन भयंकर प्रकार घडू शकतो व त्यातून श्रीगोंदे तालुका प्रशासनाबाबत शंकात्मक प्रश्न उपस्थित होऊ शकतात तरी वेळीच हे अवैध व्यवसाय बंद करुन या गावांना दहशत मुक्त करण्याची मागणी लोखंडे यांनी केली आहे. 

महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत हा वाळू उपसा व वाळू वाहतूक न थांबल्यास श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलीस ठाणे येथे गांधीगिरी करून सर्व अधिकारी यांचा सत्कार करून निषेध नोंदविला जाणार आहे. त्यानंतर 10 दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे या परिसरातील ग्रामस्थांसह आपण उपोषणाला बसणार आहोत, असेही लोखंडे यांनी स्पष्ट केले.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration is helping the sand subdivision, the NCP leader alleged