esakal | अहमदनगरचे कलेक्टर राहतात महलात! पाचशे वर्षांपासून मिळतो मान, मक्का-मदिनेहून आणले खांब
sakal

बोलून बातमी शोधा

 The administration of Nagar district runs from a building built five hundred years ago

शेजारील नाशिक आणि सोलापूर हे आता निर्माण झालेले जिल्हा अहमदनगरमध्ये होते. विभाजनानंतर त्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. ब्रिटिशांनी नंतर आपला लष्करी येथेच आणला.नगर शहराची निर्मिती १४९०साली झाल्याचे सांगितले जाते.

अहमदनगरचे कलेक्टर राहतात महलात! पाचशे वर्षांपासून मिळतो मान, मक्का-मदिनेहून आणले खांब

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः ऐतिहासिक म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे ऐश्वर्य फार मोठे आहे. कैरो, बगदाद या आखाती देशासोबत या शहराची तुलना व्हायची. निजामशाहीत या शहराचे मोठे ऐश्वर्य अनुभवले आहे. शिवशाही, पेशवाई आणि नंतर आलेल्या ब्रिटिशांच्या काळातही ते टिकून होते.

नाशिक-सोलापूरही होते नगर जिल्ह्यात

शेजारील नाशिक आणि सोलापूर हे आता निर्माण झालेले जिल्हा अहमदनगरमध्ये होते. विभाजनानंतर त्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. ब्रिटिशांनी नंतर आपला लष्करी येथेच आणला.नगर शहराची निर्मिती १४९०साली झाल्याचे सांगितले जाते. निजामशाहीतील सरदारांनी या शहराच्या वैभवात भरच घातली.

आतापर्यंत झाले ५८ कलेक्टर

नगर जिल्ह्यात आतापर्यंत ५७ कलेक्टर होऊन गेले आहेत. राजेंद्र भोसले हे ५८वे कलेक्टर आहेत. शहरात पहिला कलेक्टर आला तो हेन्री पॉटिंजर नावाचा इंग्रज अधिकारी. त्याला ही वास्तू निवासस्थान म्हणून देण्यात आली. आजतागायत हीच वास्तू प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने उपयोगात आणली आहे.

ही वास्तू अतिशय देखणी आहे. तेथील कोरीव शिल्प, खांब, भिंती पाहण्यासारख्या आहेत. दख्खनी शैलीतील ही इमारत आहे. तब्बल पाच शतके याच वास्तूने नगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल घडवला. खरेतर हा महालच आहे.

काय आहे या वास्तूचा इतिहास

निजामशाही काळात १५०० ते १५०८ या दरम्यान हा महाल बांधण्यात आला. तो कासिमखान या सरदाराने स्वतःसाठी बांधून घेतला. पुढे त्याच्याच नावाने तो महाल ओळखला जाऊ लागला. आता नगर निवास नावाने तो ओळखला जातो. हा महाल अलिशान आहे.

मक्का मदिनाहून आणले खांब

तब्बल सात एकरांचा या महलाचा परिसर आहे. ही वास्तू दुमजली आहे. यात मुख्य हॉल, तीन बेडरूम, भव्य भटारखाना म्हणजे किचन आहे. प्रत्येक खोल्यांमध्ये दख्खनी शैलीतील नक्षीकाम आहे. विशेष म्हणजे मक्का मदिनाहून या महालासाठी लोखंडी खांब आणले आहेत. आजही ते सुस्थितीत आहेत. या महलातील तापमान तिन्ही ऋतुत सारखेच असते. उन्हाळ्यात थंडगार वातावरण असते.

दुष्काळातही सुरू होती कारंजी

या महालात १९६० पर्यंत पाण्याची कारंजी सुरू होती. खापरी नळाद्वारे या महलात पाणी आणले होते. विशेष म्हणजे विजेचा वापर न करता कापूरवाडी, पिंपळगाव माळवी तलावातून हे पाणी आणले होते. इराणी तंत्रज्ञ बिदरहून बाहमनी राज्यातून निजामशाहीत आले होते. त्यांनीच ही व्यवस्था केली होती. तब्बल तेरा खापरी पाईपलाईन त्या काळात टाकल्या होत्या.

विविध प्रकारचे पक्षी

कलेक्टर बंगल्या विविध प्रकारची वृक्ष राजी आहे. आंबा, नारळ, चिकू, केळी तसेच इतर प्रकारची वृक्ष आहेत. तेथे असलेल्या गावरान गाईसाठी चाराही तेथेच पिकवला जातो. हा परिसर शहराच्या मध्यवस्तीत आहे. वृक्षराजींमुळे परिसरात नाचण, चिरका, कोतवाल, वेडा राघू, होला, भांगपाडी, मुनिया, हळद्या, वटवट्या, शिंजीर, खंड्या, भारद्वाज, मधुबाज, शिक्रा, तांबट, चष्मेवाला, सुभग आदी पक्षी नगर निवासात आहेत.

कलेक्टरांचा बंगला हा नगर निवास म्हणून ओळखला जातो. तो कासीम खान या निजामशाहीतील सरदाराने बांधला आहे. त्याला कासीमखानी महाल अशीही ओळख आहे. हा महाल वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिले ब्रिटिश कलेक्टर पॉटिंजरपासून आताच्या राजेंद्र भोसले यांच्यापर्यंत हे निवासस्थान दिले जाते. विशेष म्हणजे हे सरकारी निवासस्थान सर्वच अधिकाऱ्यांना आवडते. या इतिहासावर मी नुकतेच पुस्तक प्रकाशित केले आहे.

-प्रा.डॉ. संतोष यादव, अभिरक्षक, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर

loading image