घरातील किचन पूर्वेकडे असेल तर फायदाच फायदा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

ईशान्य ही उपदिशा प्राणिक अक्षाची आहे. या उपदिशेत अग्नी ज्योत स्वरूप आहे. ज्योतीवर स्वयंपाकघर होणे शक्‍य नाही; पण जिथे या ईशान्येत स्वयंपाकघर असते.

नगर ः वास्तुशास्त्रानुसार आपले घर असावे, असे प्रत्येकालाच वाटते; पण बहुतेक वेळा विविध कारणांमुळे ते शक्‍य होत नाही. मात्र, वास्तुरचना आणि पंचतत्त्वाची सांगड आपण घालू शकलो, तरी चांगले परिणाम अनुभवाला येतात. 

नैसर्गिक अग्नीचा गोळा म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवतो. नैसर्गिक अग्नितत्त्वाची दिशा ही पूर्व आहे आणि त्या अग्नीचे प्रकर्षगुण अग्नेय दिशेला आहे. आरोग्य, ऐश्वर्य आदी भौतिक जीवन अनुकूल करून देणारा तो अग्नी. चेतना देणारा, काम पुढे नेणारा तो अग्नी. नेतृत्व करणारा, मार्गदर्शन करणारा तो अग्नी. अग्नीला पृथ्वीचा आधार आहे. किंबहुना, पृथ्वीतत्त्वाची सुरवात अग्नेय या उपदिशेतूनच होते. नैसर्गिकदृष्ट्या सूर्य या दिशेतून जातो. म्हणजेच सकाळी पोषण त्याच्या अवस्थेतून जात असतो. वैद्यकीय शास्त्रामध्ये हीच वेळ व्यायामाची सांगितली आहे. 

ईशान्य ही उपदिशा प्राणिक अक्षाची आहे. या उपदिशेत अग्नी ज्योत स्वरूप आहे. ज्योतीवर स्वयंपाकघर होणे शक्‍य नाही; पण जिथे या ईशान्येत स्वयंपाकघर असते, त्या कुटुंबाचे अर्थकारण, संततीचा सर्वांगीण विकास, आरोग्य, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. जरी ईशान्य ही पूर्व दिशेची उपदिशा असली, तरी ईशान्य ही जलतत्त्वाची दिशा आहे आणि अग्नी हा पृथ्वीवर पेटतो. म्हणजेच अग्नीला पृथ्वीचा आधार आहे. म्हणजे आपल्या वास्तूत जिथे अग्नी आहे, तिथे पृथ्वीतत्त्व साकारले आहे. म्हणूनच, वास्तुरचना करताना विचार करून रचना करावी लागते. ईशान्येतले स्वयंपाकघर हे अशा वास्तूचा एक प्रकारे जैव-प्राण अक्ष घोटून टाकतो. 

आपल्या वास्तूतल्या पूर्वमध्यातला अग्नी हा ज्वाला स्वरूप आहे. या पूर्वमध्यातल्या अग्नीमुळे वाणीत सत्यता, तसेच प्रखरता येते. ज्वालेप्रमाणेच शब्दांच्या ज्वालाही वास्तूत कधी कधी धगधगतात. कोणतेही काम सुरू करायला थोडासा वेळ लागतो. बुद्धी, पराक्रम, मिळविलेले नाव टिकवून ठेवणे जड जाते. मात्र, ईशान्य स्वयंपाकघरापेक्षा बरे. 

आजकाल आपण पाश्‍चिमात्य फ्लॅट संस्कृती स्वीकारलीच आहे. त्यामुळे किमान स्वयंपाकघर पूर्व दिशेत पूर्वाभिमुख असेलच, एवढी तरी काळजी घ्यावी, जेणे करून पूर्वेचे तरंग लक्ष्मीप्रदाचा आशीर्वाद देतील . 

- डॉ. कौस्तुभ काळे, अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The advantage is if the kitchen in the house is on the east side