प्रसुती झाल्यानंतर बिबट्याची मादी १५ दिवसाने बदलते जागा

शांताराम काळे
Tuesday, 25 August 2020

भंडारदरा गावाच्या जवळ असलेली वडाच्या वाडीत पाटील वस्तीत आठ  दिवसापासून बिबट्याचा वावर आहे.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा गावाच्या जवळ असलेली वडाच्या वाडीत पाटील वस्तीत आठ  दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. या वस्तीतील आदिवासी ग्रामस्थ रात्री सिंगल फेज वीज असल्यामुळे टेंभे, विजेरी लावून व डफडे घेऊन रात्र जागत आहेत. 

हा बिबट्या रात्री ९ नंतर या वस्तीकडे येऊन कोंबड्या व शेळ्यांचा फडशा पाडतं आहे. तर काही कुत्राही त्याने भक्ष्यस्थानी केले असून रात्री तो वस्तीकडे येत आहे. आठ दिवसापासून त्याचा उपद्रव सुरु असल्याचे येथीली ग्रामस्थ सांगत आहेत. 

येथील ग्रामस्थ अरविंद खाडे, पोलिस पाटील, दत्तू खाडे, रामा खाडे, गोविंद कोकतरे, गोरख खाडे, यशवंत खाडे, पांडुरंग देशमुख, पांडुरंग खाडे आदींनी वन विभागाला संपर्क केला असून वनविभागाचे अधिकारी जी. जी. गोंदके यांनी पिंजरा लावण्यास जागा नाही. या बिबट्याने बछड्याना जंगलात जन्म दिला असून हा मांजर कुळातील प्राणी आहे. तो आपली प्रसूती झाल्यानंतर १५ दिवसांनी जागा बदलत असतो.

आम्ही आमचे वन कर्मचारी त्याच्यावर लक्ष्य ठेवून असून लवकरच तो जाईल, असे अलिखित उत्तरे वनविभागाकडून दिली जात आहे. मात्र ग्रामस्थ भीतीने रात्र जागवून काढत आहेत. सोमवारी  रात्री हा बिबट्या आला असता ग्रामस्थांनी विजेरी, टेंभे लावून व ढोल वाजवून त्याला पळवून लावले आहे. रात्रीच्या वेळी जनावरे घरात घेतली जात आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After giving birth the female leopard changes position after 15 days