जिल्हाधिकाऱ्यांनी तपासला शिवभोजन थाळीचा दर्जा !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

अचानक जिल्हाधिकारी शिवभोजन केंद्रात आल्याने नागरिक आश्‍चर्यचकीत झाले. आपण कुठून येता, काय काम करता, येथे किती दिवसांपासून येता, अशी विचारणा डॉ. भोसले यांनी तेथे जेवणासाठी आलेल्या नागरिकांना केली. जेवणाच्या दर्जाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनीही असेच चांगले जेवण देत जा, अशी सूचना केंद्रचालकांना केली. 

अहमदनगर : महापालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रांना अचानक भेटी देऊन जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी  सकाळी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. 

तारकपूर येथील कृष्णा शिवभोजन केंद्रातील अन्नपदार्थांचा दर्जा तपासला. नियमाप्रमाणे तेथे येणाऱ्या नागरिकांना थाळी देण्यात येते का, याची माहिती घेतली. तेथे जेवण करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. अचानक जिल्हाधिकारी शिवभोजन केंद्रात आल्याने नागरिक आश्‍चर्यचकीत झाले. आपण कुठून येता, काय काम करता, येथे किती दिवसांपासून येता, अशी विचारणा डॉ. भोसले यांनी तेथे जेवणासाठी आलेल्या नागरिकांना केली. जेवणाच्या दर्जाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनीही असेच चांगले जेवण देत जा, अशी सूचना केंद्रचालकांना केली. 

काही जण कामानिमित्त, तर काहींचे नातेवाईक रुग्णालयात असल्याने ते केंद्रात जेवणासाठी येतात, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना आढळून आले. भोजनालय चालकाकडेही त्यांनी विचारणा केली. रोज किती जण जेवतात, किती पैसे घेता, याची माहिती घेतली. जेवणासाठी आलेल्या नागरिकांकडूनही त्याची पडताळणी केली. पार्सलद्वारे देण्यात येणाऱ्या जेवणासाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
 
शहर व जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची आपणासह प्रशासनातील इतर अधिकारी वेळोवेळी भेटी देऊन पाहणी करणार आहोत. शिवभोजन केंद्रचालकांनीही जेवणासाठी येणाऱ्या नागरिकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After making surprise visits to shivbhojan kendras in ahmednagar municipal corporation area district collector dr. rajendra bhosale has inspected the system