रस्त्यावर रांगोळी, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन तरुणांकडून प्रशासनाचा निषेध

विलास कुलकर्णी
Tuesday, 29 September 2020

वांबोरी येथे तरुणांनी वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले.

राहुरी (अहमदनगर) : वांबोरी येथे तरुणांनी वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध करून, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही. तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी दिला. तसे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्यात तीन ते चार फुटांपर्यंतचे खड्डे आहेत. वांबोरी शहरात मोठी बाजारपेठ आहे. परिसरात केएसबी कंपनी, प्रसाद शुगर कारखाना, बाजार समिती यांची वाहतूक याच रस्त्याने असते. परिसरातील पिंपळगाव, आढाववाडी, डोंगरगण, गड मांजर सुंभा, पाची महादेव या गावातील नागरिकांना वांबोरी व राहुरीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. कुक्कडवेढे, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, कात्रड, चेडगाव, उंबरे, ब्राह्मणी या गावांना नगरला जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे. त्यामुळे, या रस्त्याने रोज शेकडो वाहने धावतात. 

रस्त्यातील खड्ड्यांमुळे रोज अपघात घडत आहेत. वाहनांचे स्पेअर पार्ट व प्रवाशांचे हाडं खिळखिळी होत आहेत. गंभीर जखमी प्रवाशांना प्राणाला मुकावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तक्रारी करूनही खड्ड्यांचे दुरुस्ती होत नाही. त्यामुळे संतप्त तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विष्णू ढवळे, रंगनाथ गवते, अशोक तुपे, दीपक साखरे, राम क्षीरसागर, आदेश सत्रे व इतर तरुणांनी आंदोलनात भाग घेतला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An agitation by planting trees on the road by the youth in Wambori in Rahuri taluka