कर्जतमध्ये घंटागाडीचालकाला मारहाण, कर्मचाऱ्यांनी धरले धरणे

नीलेश दिवटे
Friday, 6 November 2020

बाजारतळावरील शौचालय साफ करण्यासाठी पिसाळ आज सकाळी पाण्याचा टॅंकर घेऊन गेले होते.

कर्जत : नगरपंचायत कर्मचारी व घंटागाडीचालक पद्माकर पिसाळ यांना एकाने शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थकर्मचाऱ्यांनी "काम बंद' आंदोलन केले. दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी नगरपंचायतीपुढे धरणे आंदोलन केले. 

बाजारतळावरील शौचालय साफ करण्यासाठी पिसाळ आज सकाळी पाण्याचा टॅंकर घेऊन गेले होते. शौचालय स्वच्छ करीत असताना, तेथे एक जण वाहनातून आला. मात्र, टॅंकरमुळे त्याला जाण्यासाठी रस्ता नसल्याने पिसाळ यांनी तेथील केळीची हातगाडी बाजूला घेऊन रस्ता करून दिला. मात्र, त्याने संबंधिताचे समाधान झाले नाही. त्याने पिसाळ यांना शिवीगाळ व मारहाण केली.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी "काम बंद' आंदोलन केले. मारहाण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी नगरपंचायतीपुढे धरणे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी कामगारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

दुपारनंतर काम पूर्ववत सुरू झाले. आंदोलनात संतोष समुद्र, बापू उकिरडे, राकेश गदादे, विलास शिंदे, सुनील नेवसे, नितीन गलांडे, नाना कचरे, गजानन नेटके, किशोर भैलुमे आदींनी भाग घेतला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitations over beating of garbage truck driver in Karjat