कृषी प्रोडक्शन कंपनीमुळे युवकांना व्यवसायात संधी निर्माण झाली

अरुण गव्हाणे
Monday, 7 December 2020

शेती व्यवसायात चढ- उतार सुरु असतात. अनेक वेळा शेतीसाठी लागणारे साहित्य अवाजवी रक्कम मोजुन विकत घ्यावी लागते.

पोहेगाव (अहमदनगर) : शेती व्यवसायात चढ- उतार सुरु असतात. अनेक वेळा शेतीसाठी लागणारे साहित्य अवाजवी रक्कम मोजुन विकत घ्यावी लागते, परंतु सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली साई यश कृषी प्रोडक्शन कंपनी शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी माफक दर लावेल.

त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन पैसे वाचतील. प्रा. रावसाहेब जावळे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या कृषी प्रोडक्शन कंपनीमुळे युवकांना व्यवसायात संधी निर्माण झाली, असे प्रतिपादन शिवसेना नेते नितीन औताडे यांनी केले.

ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे साईयश फार्मर प्रोडक्शन कंपनीचे घेतलेल्या कार्यक्रमात  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे, कंपनीचे व्यवस्थापक रावसाहेब जावळे,चिलु जावळे, शिवाजी जावळे, धोंडीराम जावळे, विश्वनाथ जावळे, तुकाराम गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, सरपंच गंगाराम खोमणे ,उपसरपंच किशोर जावळे, अदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते फीत कापून कंपनीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी पोलिस अधीक्षक दौलतराव जाधव म्हणाले, शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरणे गरजेचे आहे. सोनेवाडी येथील साई यश कृषी प्रोडक्शन कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध झाला. शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला माल हा व्यापाऱ्याला रोख स्वरूपात विकला पाहिजे.जादा भावाचे आमिष दाखवून व्यापारी शेतकऱ्यांना लुटतात याचे अनेक अनुभव सोनवडी परिसरात आले आहे. तेव्हा रोख घ्या आणि रोख द्या हीच नीती शेतकऱ्यांनी अवलंबली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश जावळे यांनी केले तर आभार प्रा रावसाहेब जावळे यांनी मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agricultural production company created opportunities for the youth in business