शेतीला दिवसा वीज मिळणार, मंत्री मुश्रीफ यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले काम केले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि सहकाऱ्यांनी नियोजन करून चार दिवसांतच पंचनामे केले.

नगर ः जिल्ह्यात बिबट्यांचे नागरिकांवरील हल्ले वाढल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याची दखल घेतली आहे. बिबटे पकडण्यासाठी अधिक पिंजरे मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, तसेच शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाणे टाळावे. बिबट्यांचा वावर असणाऱ्या परिसरात शेतीला दिवसा वीज देण्यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व मदतवाटप, बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यावरील उपाययोजना, तसेच कृषी योजनांचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला.

जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते. 

पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारने 10 हजार कोटींचे "पॅकेज' जाहीर केले होते. आतापर्यंत 73 कोटी 50 लाख रुपयांच्या मदतीचे नगर जिल्ह्यात वितरण झाले आहे. उर्वरित निधी लवकरच प्राप्त होऊन वितरित होईल.'' 

दरम्यान, कोरोना संकटात सेवा बजावताना निधन झालेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मुश्रीफ यांच्या हस्ते 50 लाख रुपयांचा धनादेश व कृतज्ञतापत्र प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांना रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे पिकांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यासंदर्भात मंत्री राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले काम केले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि सहकाऱ्यांनी नियोजन करून चार दिवसांतच पंचनामे केले. त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना "पॅकेज' जाहीर केले. जिल्ह्यासाठी 128 कोटींची मागणी असून, पहिला 73 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले असले, तरी कोरोनाबाबत निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. 

आर. आर. पाटील सुंदर गाव योजना 
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी (स्व.) आर. आर. पाटील सुंदर गाव योजना कार्यान्वित केली आहे. त्यासाठी गावांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. असे महत्त्वाचे 20 निर्णय घेतल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture will get electricity during the day, informed Minister Mushrif