
हिरण यांच्या अपहरणासह हत्येबाबत पोलिसांना तपासादरम्यान सबळ पुरावे मिळाल्याने संशयीत आरोपी निष्पण झाले आहेत
श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांच्या अपहरणासह हत्येबाबत पोलिसांना तपासादरम्यान सबळ पुरावे मिळाल्याने संशयीत आरोपी निष्पण झाले आहेत. पोलिस पथकाने दोन संशयीत आरोपींना पकडले असून सागर गंगावणे (वय. ३२) आणि बिटु उर्फ रावजी वायकर (वय. ३५, रा. दोघेही, श्रीरामपूर परिसर) अशी त्यांची नावे आहेत. दोघांवरही यापूर्वी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आज सांयकाळी पोलिस अधीक्षक पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, संगनमेर येथील पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरिक्षक संजय सानप उपस्थित होते.
दरम्यान, सोमवारी (ता.१) सांयकाळी बेलापूर-राहुरी बाह्यवळण येथून व्यापारी हिरण यांचे अपहरण झाले होते. शहर पोलिसांनी याप्रकरणी रविवारी (ता.२) बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस तपास सुरु असताना काल (ता.७) सकाळी येथील वाकडी रस्त्यावरील यशवंतबाबा रेल्वे चौकी परिसरात हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पहाणी करुन हिरण यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविला होता.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, हिरण यांच्या मृतदेहाचा उत्तरणीय तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात हिरण यांच्या डोक्याला गंभीर मार लागण्याचे स्पष्ट होते. पोलिसांना तपासामध्ये खात्रीशिर माहिती मिळाली. त्यातून पुढे काही धागेदोरे सापडल्याने तपासाला वेग आला.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४० जणांची चौकशी केली असून पुढील तपासामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी गंगावणे आणि वायकर यांना श्रीरामपूर परिसरातूनच पकडल्याचे पाटील यांनी सांगितले. आपण स्वतः हिरण प्रकणात लक्ष घातले असून कुठल्याही आरोपींची गय केली जाणार नाही. तपासासाठी अनेक पथके तैनात केली जाणार असून जोपर्यंत गुन्हा पुर्णपणे उघड होत नाही तोपर्यंत पोलीस प्रशासन थांबणार नाही.
पोलिसांनी अनेक गुन्हेगारांच्या याद्या तयार केल्या असून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुन्ह्याला योग्य कलम लावणे हाच सर्वांत महत्वाचा उपाय आहे. गुन्हा उशिरा दाखल करण्याचे काम केल्यास संबधीत पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात आतापर्यंत २१ पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्याची माहिती पोलीस अधिक्षक पाटील यांनी दिली.
हिरण यांच्यावर अंत्यसंस्कार
दरम्यान, पोलिसांनी व्यापारी हिरण त्यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीनंतर आज दुपारी साडेतीन वाजता औरंगाबादहून येथील बोरावके नगर परिसरात त्यांच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी व्यापारी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत हिरण यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजपचे जेष्ठ नेते सुनील मुथ्था, माजी सभापती दीपक पटारे, काँग्रेसचे अरुण नाईक, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुधीर नवले, शरद नवले, देवीदास देसाई, लक्की सेठी, सिध्दार्थ मुरकुटे यांनीही कठोर करावाई करण्याची मगाणी केली.
हिरण यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली होती. परंतू पुढील दोन दिवसांत आरोपींना गजाआड करणार असल्याचे आश्वासन पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिल्यानंतर मृतदेह बेलापूर येथे अंत्यसंस्कारासाठी सायंकाळी पाच वाजता पाठविला. त्यानंतर बेलापूर नदी परिसरात सांयकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात तसेच पोलिस बंदोबस्तात हिरण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा निषेध करुन आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बेलापूर ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाने आज सलग तिसऱ्या दिवशीही बेलापुरात बंद पाळून शोक व्यक्त केला. बेलापूरसह येथील बोरावके नगर परिसरात दिवसभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संपादन - धनाजी सुर्वे