नगरमध्ये ७९ शिक्षक निघाले कोरोनाबाधित, ११ हजारजणांची चाचणी

दौलत झावरे
Sunday, 6 December 2020

जिल्ह्यात 378 शाळांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीद्वारे अध्यापन सुरू आहे. उर्वरित शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.

नगर ः राज्य सरकारच्या निर्देशानुसार, शाळा सुरू झाल्या असल्या, तरी त्यास म्हणावा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. जिल्ह्यात सध्या अवघ्या 378 शाळा सुरू झाल्या असून, फक्त 11 हजार विद्यार्थी ऑफलाइन धडे गिरवत आहेत. 

राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या 1200 शाळा असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहेत. एकूण 16 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 11 हजार शिक्षकांची चाचणी झाली आहे. त्यात आतापर्यंत 79 जणांचे अहवाल बाधित आले असून, अजून अनेक कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.

जिल्ह्यात 378 शाळांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीद्वारे अध्यापन सुरू आहे. उर्वरित शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या सूचनांनुसार शाळा सुरू झाल्या असून, माध्यमिक शिक्षण विभागाकडून रोज शाळांचा आढावा घेतला जात आहे. किती शिक्षकांच्या तपासण्या झाल्या आहेत, याची माहिती घेतली जात आहे. 

जिल्ह्यातील 1200 शाळा आहेत. शासनआदेशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात 1 लाख 84 हजार विद्यार्थी आहेत. जिल्ह्यातील सध्या 378 शाळा ऑफलाइन अध्यापनाचे धडे देत असून, विद्यार्थ्यांचा ऑफलाइन शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद आहे. 

पालक धास्तावलेले 
शाळा सुरू झाल्या असल्या, तरी पालकांकडून शाळा संमतीपत्र घेत आहेत. मात्र, त्याचीच धास्ती पालकांनी घेतली असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होत आहे. हमीपत्राची अट शिथिल केल्यास उपस्थिती वाढण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ahmednagar, 79 teachers went corona positive