
प्रशासनाने लग्नसमारंभांवर निर्बंध घातले आहेत, तसेच सर्व समारंभ, जत्रा, यात्रांना फक्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे.
नगर ः कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी व दिवसभर जमावबंदीचा आदेश दिला आहे. हा आदेश 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अध्यादेश काढून जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
हेही वाचा - पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने तरूणाची आत्महत्या
प्रशासनाने लग्नसमारंभांवर निर्बंध घातले आहेत, तसेच सर्व समारंभ, जत्रा, यात्रांना फक्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. या सर्वांनी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सचा नियम पाळणे आवश्यक आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. शाळा- महाविद्यालयांत "नो मास्क, नो एन्ट्री'चा अवलंब करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक संमेलने, विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 50 व्यक्तींमध्येच घेण्याचेही आदेशात म्हटले आहे.
सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत दुकाने सुरू राहणार आहेत. त्यासाठी कुठलेही निर्बंध नसले, तरी सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, तसेच घराबाहेर पडताना मास्क वापरावे, असे आदेशात म्हटले आहे. हे निर्बंध 15 मार्चपर्यंत अमलात राहतील.