Ahmednagar : अकोलेत शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन

Ahmednagar : अकोलेत शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन

अकोले : शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या प्रतिमेस जोडे मारून तालुक्यातील शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवसेना तालुका कार्यकारणी जाहीर करताना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांची नवीन कार्यकारीणीतून हकालपट्टी केल्याने धुमाळ समर्थक नाराज झाले. त्यांनी कोल्हार- घोटी रस्त्यावर संताप व्यक्त केला. तातडीने कार्यकारीणी बदलली नाही तर शिवसेना पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते प्रमोद मंडलिक यांनी दिला.

अकोले तालुका शिवसेना कार्यकारीणी घोषित करण्यात आली. अकोले शिवसेना तालुकाप्रमुखपदी डॉ. मनोज मोरे यांची तर शहरप्रमुखपदी नितीन नाईकवाडी यांची निवड झाली आहे. निवडीनंतर फटाके फोडून निवडीचे स्वागत करण्यात आले. तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांना हटवून त्यांचे मेहुणे डॉ. मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे धुमाळ समर्थकांनी आंदोलन करून संपर्क पदावरून घोलप यांना हटवा, अशी मागणी केली.

मंडलिक म्हणाले, की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असून संपर्क प्रमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. तो तातडीने बदलला नाही तर शिवसैनिक पदाचे राजीनामे देतील. गेली चाळीस वर्षे शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पिचड यांना विरोध केला. मागील विधानसभेत शिवसेनेची जागा सोडली नसती तर आमदार शिवसेनेचा असता. आजही शिवसेना तितक्याच ताकदीने काम करत आहोत. संपर्क प्रमुख यांनी तालुका कार्यकारणी बदलून अन्याय केला आहे. मुंबई येथे जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना भेटून आमच्या व्यथा मांडू.