
Ahmednagar : बसस्थानकांना हवे सुरक्षेचे कुंपण
अहमदनगर : बसस्थानकांत स्वच्छता राहावी तेथे अतिक्रमणे होऊ नयेत, प्रवाशांना सुरक्षा मिळावी, या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील एकूण १२ बसस्थानकांना संरक्षण भिंती बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु तब्बल तीन वर्षांपासून ही कामे सुरू असून, त्यातील एकच काम पूर्ण झालेले असून, चार कामे सुरू असून, उर्वरित सात कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. अशी स्थिती असतानाही एसटी प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या काही जागांवर अतिक्रमण होत आहेत. तसेच संरक्षण भिंती नसल्याने बसस्थानक आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्याने बसस्थानकांत घाणीचे साम्राज्य निर्माण होत होते. हे प्रकार टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सर्व बसस्थानकांना संरक्षण भिंती बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
जिल्ह्यातील सुमारे २९ बसस्थानकांपैकी १२ बसस्थानकांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामाचा २६ फेब्रुवारी २०१९ला कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार कामकाज सुरू झाले. मात्र त्यातील जामखेड बसस्थानकातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, चार बसस्थानकांतील कामे अपूर्ण आहेत. सात बसस्थानकांची कामेच सुरू झालेली नाहीत. ही कामे तब्बल तीन वर्षांपासून सुरू असताना एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे. बसस्थानकांत सुविधा मिळत नसल्यानेही प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात माहितीसाठी एसटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
जामखेडमधील काम पूर्ण
जामखेड बसस्थानकातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.मिरजगाव, सोनई, नेवासे, कोपरगाव बसस्थानकांतील कामे सुरू आहेत. श्रीगोंदे, पाथर्डी, बोटा, सुपे, पारनेर, कामरगाव, सावेडी येथील कामच सुरू झालेले नाही.
कामांची स्थिती
एकूण कामे ः १२ पूर्ण कामे ः १
चालू स्थितीत कामे ः ४ सुरू कामे ः ७
कार्यारंभ आदेशाची तारीख...............२६ फेब्रुवारी २०१९
कामे पूर्ण करण्याचा कालावधी...........१० महिने
Web Title: Ahmednagar Bus Stands Need Security Fence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..