
अहमदनगर : चोरट्यांवर ‘वॉच’ ठेवणारी ही यंत्रणा
कर्जत : सततच्या घरफोड्या, दरोड्यातील चोरटे पकडणे, कर्जत पेट्रोल पंपावरील दरोडा, अशा शेकडो घटनांवर ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे यशस्वी नियंत्रण मिळवता आले. चोरट्यांवर ‘वॉच’ ठेवणारी ही यंत्रणा वार्षिक शुल्काच्या रकमेअभावी अनवॉच होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गावांना या यंत्रणेचे वार्षिक शुल्क तात्काळ भरून या यंत्रणेची अखंडितपणे सेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या प्रयत्नातून कर्जत तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु झाली. या यंत्रणेच्या एकाच आपत्कालीन कॉलवर संपुर्ण तालुक्याला व गावाला एकाचवेळी सतर्क करणाऱ्या या यंत्रणेमुळे चोऱ्या, दरोड्यांवर वॉच राहून ही यंत्रणा चोरट्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडते. या यंत्रणेत सहभागी असलेल्या नागरीकांना वेळोवेळी सर्व माहिती मिळून घडणाऱ्या विपरीत घटनांपासून संरक्षण मिळवता आले.
ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी यंत्रणेच्या लाभासाठी यंत्रणेचे मालक डी. के. गोरडे यांच्या खात्यावर ५० रुपये शुल्क पाठवायचे आहेत. मात्र, तालुक्यातील अनेक गावांकडुन या यंत्रणेच्या शुल्काची रक्कम भरली. त्यामुळे सर्व यंत्रणा बंद पडली होती. केवळ चोरी, दरोड्याच्या कॉलसाठी ती तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली. अन्य कोणताही संदेश या यंत्रणेवरून देणे बंद आहे. गावची जबाबदारी उत्तमरीत्या पेलणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, स्थानिक नेते मंडळींनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या अखंडित सेवेसाठी सक्रिय सहभागाची गरज आहे.
पोलिसांकडून होणार सन्मान
तालुक्यातील गावांमध्ये कार्यरत असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा अखंडितपणे सुरू रहावी व गावाला गुन्हेगारी व वैयक्तिक आणि सार्वजनिक आर्थिक नुकसानीपासून वाचवता यावे यासाठी वैयक्तिक पुढाकारातून कोणत्याही व्यक्तीला गावाची पुर्ण रक्कम भरता येऊ शकते. अशा दानशूर व्यक्तींचा कर्जतच्या पोलीस यंत्रणेकडून सन्मान करण्यात येणार आहे.
Web Title: Ahmednagar Chandrasekhar Yadav Gram Panchayat Village Security Thieve
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..