
नगर-दौंड महामार्ग मृत्यूचा सापळा
श्रीगोंदे : अहमदनगर- बेळगाव हा श्रीगोंद्याच्या हद्दीतून जाणारा महामार्ग वाहनचालकांसाठी निर्दयी ठरतोय. सिमेंटचा हा तीनपदरी महामार्ग गेल्या काही वर्षांत वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर अपघातांत शेकडो जणांचे बळी गेले आहेत. मार्गाच्या मध्यभागी दुभाजक नसणे, अनेक ठिकाणी मार्गाची रुंदी कमी असणे, तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे हा मार्ग निष्पाप लोकांचा बळी घेतोय.
नगर-दौंड हा दोन जिल्ह्यांना व तीन तालुक्यांना जोडणारा महामार्ग अजून अपूर्णच आहे. चिखली घाटातील खोदलेला रस्ता डांबरीकरणाने व्यवस्थित झाला, मात्र लोणी व्यंकनाथ रेल्वे गेट या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. उर्वरित ठिकाणचा रस्ता पूर्ण झाल्याने सुसाट जाणारी वाहने अनेकांच्या मनात धडकी भरवितात. गावांच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र, काही गावांच्या हद्दीत रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण जागीच ठेवल्याने दुभाजक टाकलेले नाही.
तीनपदरी रस्ता असल्याने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांना समोरच्या वाहनाची गती लक्षात येत नसल्यामुळे अपघात वाढत आहेत. मोटारसायकलस्वारांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र जागा ठेवली असली, तरी अनेक वेळा हे मोटारसायकलस्वार रस्त्याच्या मध्यभागातून चालतात. त्यामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्याच्या कामात राहिलेल्या अनेक त्रुटींमुळे जेथे दुभाजक आहेत, ते वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.
तीनपदरी रस्ता आणि पांढरे पट्टे....
हा महामार्ग चौपदरी नव्हे तर तीनपदरी आहे. त्यामुळे मध्यभागी दुभाजक नाहीत. समोरून येणाऱ्या वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह मध्यभागी काही ठिकाणी पांढरे पट्टे मारले असले, तरी अनेक ठिकाणी अजून स्थिती जैसे थे आहे. शिवाय, दुचाकीस्वारही रस्त्याच्या मध्यभागातून चालत असल्याने अडचणी येत आहेत.
रंबल स्क्रिप
या महामार्गावरील गावे असणाऱ्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी पादचारी रस्ते ठेवले आहेत. मात्र, मध्यभागाचा मूळ रस्त्याचा आकार कमी करून हे पादचारी रस्ते झाले आहेत. गावाजवळ दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला लावली जात असल्याने रस्त्याची वाहतूक ठप्प होते. त्याही स्थितीत वाहनांची गती कमी होत नसल्याने अडचणी वाढतात. गतिरोधक महामार्गावर देता येत नसले, तरी रंबल स्क्रिप टाकले तरी वाहनचालकांना गतीचे भान होते.
महामार्ग पोलिस कुठे आहेत ?
महामार्ग पोलिस अजूनही या रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यानंतर स्थानिक पोलिसांनाच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहनचालकांना पोलिसांचा धाक नसल्याने गतीची भीती नसल्याचे लक्षात येते.
Web Title: Ahmednagar Daund Highway Increasing Number Of Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..