esakal | कांदा बियाणे महागले; पायलीभरासाठी मोजावे लागत आहेत ‘एवढे’ पैसे

बोलून बातमी शोधा

Ahmednagar district farmers have to pay Rs 8000 for onion seeds

गेल्यावर्षी कांद्याचे दर तेजीत असल्याने कांदा बियाणे निर्मिती घटली. त्यानंतर सिड्सचे बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले. परंतु कोरोनाच्या संकटात व्यापारासह बाजारपेठा विस्कळीत झाल्याने कांद्याचे दर समाधानकारक वाढले नाहीत.

कांदा बियाणे महागले; पायलीभरासाठी मोजावे लागत आहेत ‘एवढे’ पैसे
sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : गेल्यावर्षी कांद्याचे दर तेजीत असल्याने कांदा बियाणे निर्मिती घटली. त्यानंतर सिड्सचे बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले. परंतु कोरोनाच्या संकटात व्यापारासह बाजारपेठा विस्कळीत झाल्याने कांद्याचे दर समाधानकारक वाढले नाहीत. आता काहीअंशी कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. तसेच यंदा चांगला पाऊस असल्याने पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल असल्याने कांदा बियाणे महागले आहे.

गेल्यावर्षी कांद्याचे दर तेजीत असल्याने कांदा बियाणे निर्मिती कमी प्रमाणात झाली. त्यामुळे यंदा कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी कांदा बियाण्यांच्या किंमती वाढल्या आहेत. एक पायली बियाण्यासाठी आठ हजारापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सध्या नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक औरंगाबादसह नाशिक जिल्ह्यातुन कांदा बियाणे खरेदी करत आहे. यंदाच्या तुलनेत मागीलवर्षी कांद्याचे दर तेजीत होते. त्यामुळे कांदा बियाणे निर्मितीपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीवर भर दिला. यंदा कांद्याचे दर कमी असले तरी पाऊस समाधानकारक असल्याने कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे.

त्यासाठी सिड्सच्या बियाणेपेक्षा घरगुती बियाणांना शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळते. तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक औरंगाबादसह नाशिक जिल्ह्यातील नातेवाईकांसह मित्रपरिवाराकडुन महागड्या दराचे खात्रीशिर कांदा बियाणे खरेदी करीत आहे. तालुक्यात यंदा कांदा बियाणेचा तुटवडा भासत असुन कांदा बियाण्यांच्या किंमती वाढल्या आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सिड्सच्या सोयाबीन बियाणात फसवणुक झाली. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. आता कांदा बियाणाबाबत असे होऊ नये. म्हणुन खात्रीशीर बियाण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कन्नड (जि. औरंगाबाद) येथून महागड्या दराने कांदा बियाणे खरेदी करीत आहे. चांगल्या प्रतिच्या बियाणांसाठी पायलीला आठ हजारापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे.

यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीपासुन सलग पाऊस असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. पाणी साठ्यात वाढ झाल्याने यंदा कांदा लागवड वाढण्याची शक्यता आहे. सध्या कांद्याचा दर कमी असला तरी कोरोनाचे संकट गेल्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा होईल, अशी आशा शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे. इतर पिकांपेक्षा कांदा पिकांतुन उभारी मिळण्यासाठी सध्या तोट्यात असलेले कांदा उत्पादन शेतकरी नव्या आशेने पुन्हा करणार असल्याचे चित्र सध्या शिवारात दिसत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर