या जिल्ह्यात आहे सोन्याचा डोंगर, गोरक्षनाथांनी केला होता चमत्कार

Gorakshanatha had made a mountain of gold
Gorakshanatha had made a mountain of gold

नगर ः गर्भगिरी डोंगररांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. नाथ सांप्रदायाचा उदय व विकास याच पट्ट्यात झालेला आढळतो. राष्ट्रसंत तनपुरे महाराज, भगवानबाबा, भृंगऋषी, वामनभाऊ, गव्हाणेबाबा, खंडुजी बाबा आदी संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. 

गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेली मोहटादेवी याच डोंगररांगेत विराजमान आहे.

नाथ संप्रदायात या डोंगररांगेला विशेष महत्त्व आहे. गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला, असा उल्लेख पुराणातून आढळतो. पाटोदा तालुक्‍यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथांची समाधी, येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांची समाधी (जानपीर), राणी मैनावतीची समाधी, शिरुर कासार तालुक्‍यातील मानूर येथील नागनाथ, मढी येथील कानिफनाथांची समाधी आहे.

नगर-बीड मार्गावरील अडबंगीनाथ, तर गोरक्षनाथांचे वास्तव्य असलेला गोरक्षनाथ गड (ता. नगर) याच रांगेत आहेत. या डोंगरांत नवनाथांनी वास्तव्य केले. त्यांच्या लिला, चमत्कार याच भागात झाले. त्यामुळेच नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरीचा उल्लेख आढळतो.

म्हणून केला सोन्याचा डोंगर

नवनाथाची पोथी महाराष्ट्रातील बहुतांशी गावांत वाचली जाते. श्रावण महिन्यात त्याचे पारायण होते. नाथ हे सिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या कथेच चमत्कार आहेत. नवनाथाच्या कथेनुसार भ्रमंती करीत असताना मच्छिंद्रनाथ फिरत फिरत स्त्री राज्यात गेले. तेथेच त्यांनी निवास केला. तेथील राणीने त्यांना आपल्या महलात ठेवून घेतले. मात्र, आपल्या गुरूंना मूळ रूपात आणण्यासाठी गोरक्षनाथ तेथे गेले. त्यांनी गुरूंना आपल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. तेथून निघताना राणीने त्यांना सोन्याची वीट दिली.

भ्रमंती करीत असताना गुरूंच्या झोळीत गोरक्षनाथांना वीट दिसली. त्यांनी ती वीट फेकून दिली. तो परिसर म्हणजे नगर जिल्ह्यातील इमामपूर घाटाचा भाग होय. हे करीत असताना गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला. मात्र, नंतर यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तो डोंगर पुन्हा जसा होता तसा केला. हा डोंगर म्हणजेच गर्भगिरी डोंगर आहे.

नाथपंथाचे अभ्यासक टी.एन. परदेशी म्हणतात,  ही जातक कथा आहे. परंतु याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर सर्व नाथ हे सिद्ध पुरूष होते. त्यांना रसायनशास्त्राचा अभ्यास होता. त्यांची संपूर्ण ठाणी पाहिली तर ती उष्णोदकाशेजारी आहेत. तेथे गरम पाण्याचे झरे आढळतात. भारतातील पहिला रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन याच परिसरात होऊन गेला. त्याची प्रयोगशाळा शेवगाव तालुक्यात आहे. आजही मच्छिंद्रनाथांच्या गडावर स्थानिक लोक वनौषधी घेऊन बसलेले असतात. त्या कोणत्याही रोगावर उत्तम इलाज करतात. मात्र, त्याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे. गर्भगिरी डोंगर सोन्याचा झाला, याचा दुसरा अर्थ तेथील विपुल प्रमाणात सापडणाऱ्या वनौषधीमुळे तसा घेतला जातो.

हेही वाचा - मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले

भगवान शंकर वृद्धेश्‍वर येथे राहिले. मत्स्येंद्रनाथ, कानिफनाथ, याच गर्भगिरीत मढी परिसरात पवित्र स्थानांत विसावले. राम-सीता वनवासात असताना याच भूमीत काही दिवस वास्तव्यास होते. त्यामुळे सीतेचे स्नानगृह डोंगरगण (ता. नगर) येथे आहे. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सोनई परिसराकडून येताना ज्या ठिकाणी थांबले, ते "वामतीर्थ' वांबोरी याच रांगेच्या पायथ्याशी आहे. तेथून ते डोंगरगणला रामेश्‍वर जवळ आले. तेथेच सीतेचे स्नानगृह आहे.

या निसर्गरम्य परिसरात त्यांचे वास्तव्य होते. संपूर्ण महाराष्ट्राला सीतेचे डोंगरगण परिचित आहे. त्याच डोंगरपट्ट्यात गुंजाळे (ता. राहुरी) येथील डोंगरात मावलायाचे कुंड आहेत. या कुंडात दुष्काळातही पाणी असते. निघोजजवळील रांजणखळग्यांशी साधर्म्य असणारे हे कुंड किती खोल आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. गर्भगिरी डोंगररांगेसह हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून परिचित होता.

दंडकारण्यात आले होते राम-सीता

दंडकारण्याचा उल्लेख पोथी-पुाणांमध्ये आढळतो. दंडकारण्य हे रामाची वनवासाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याच भागातून शंकराचा अवतार असलेले काळभैरवनाथ सोनारीजवळ असलेल्या दैत्यांचा संहार करण्यासाठी गेले. जाताना ज्या ठिकाणी थांबले, ते आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे. भुतांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले हे देवस्थान गर्भगिरीच्या कुशीत विसावलेले आहे. 

याच डोंगरभागात गोमुख (पांढरीपूल), सीनाशंकर (ससेवाडी), बायजाबाई देवी (जेऊर), बहिरवाडीचा बहिरोबा, पिंपळगावची उज्जैनीमाता, बारा वर्षे फक्त लिंबाचा पाला व शेंगादाणे खाऊन तपश्‍चर्या केलेले आगडगाव रस्त्यावरील भृंगऋषी दऱ्यातील शेंगदाणेबाबा, संजीवनी गड, कापूरवाडीतील कानिफनाथ मंदिर, उदलमल घाटातील महादेव, ससेवाडीच्या डोंगरातील महादेवाचा दरा, सीना नदीचे उगमस्थान आदी स्थाने दुर्लक्षित आहेत. पुढे बाळनाथ गड, करंजीच्या घाटातील गव्हाणेबाबांची समाधी, पाथर्डी तालुक्‍यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेली दगडवाडीची अंबिका, तेथील राष्ट्रसंत तनपुरे महाराजांचे जन्मगाव असलेली भूमी, देवराईजवळील बालाजी मंदिर, मढी येथील कानिफनाथ देवस्थान, अशी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.

पुढे मोहटादेवी, तारकेश्‍वर गड, नागनाथ, गहिनीनाथ गड, अडबंगीनाथ गड, खरवंडी कासार येथील जनार्दन स्वामींची समाधी, धौम्यऋषी (भगवानगड), हरिहरेश्‍वर, समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती जिथे आहे, ते हनुमान टाकळी, शंखाचे मंदिर असलेली जोहारवाडी, लोहसरचा भैरवनाथ, मिरीचा विरोबा ही देवस्थाने महत्त्वाची आहेत. या प्रत्येक देवस्थानाला वेगवेगळा इतिहास आहे. सकाळचे वरिष्ठ बातमीदार मुरलीधर कराळे यांनी यांनी गर्भगिरीच्या डोंगररांगेबाबत अभ्यास केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com