
Ahmednagar : जिल्ह्यात सुमारे साडेसहाशेहून अधिक शाळांतील पोषण आहार संपला
अहमदनगर : जिल्ह्यात सुमारे साडेसहाशेहून अधिक शाळांतील पोषण आहार संपला आहे. त्यामुळे त्या शाळेतील खिचडी बंद झाली आहे. या पोषण आहाराशिवाय किमान एक महिना काढावा लागणार आहे. मात्र, तोपर्यंत शाळेला सुट्टी लागेल. त्यामुळे आता थेट जूनमध्ये खिचडी मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळांना पोषण आहार दिला जातो. वाटप केले जाते. त्यात जिल्हा परिषद, खासगी अनुदानित तसेच महापालिका अशा एकूण ४ हजार ५४८ शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते पाचवीत २ लाख ८५ हजार ३१, सहावी ते आठवीत १ लाख ८७ हजार ८६३ विद्यार्थी आहेत. अशा ४ लाख ७२ हजार ८९४ विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळतो.
शिक्षण संचालक कार्यालयाकडून वाटप मंजूर होऊन दर महिन्याचा तांदूळ १५ दिवस अगोदरच शासन जिल्ह्याच्या शासकीय गोदामात पोच करते. डिसेंबर, जानेवारी महिन्यांचा तांदूळ जिल्ह्याला प्राप्त झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चही अर्धा संपला, मात्र शाळांचा तांदूळ अद्यापि आला नाही.
शिक्षण संचालक जिल्ह्याला तांदूळ पाठवतात. पुढे शाळेत पाठवण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असते. आता शासनाने पुढील वर्षासाठी नवीन ठेकेदार नेमल्याचे म्हटले आहे. परंतु, नगर जिल्ह्यात पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे.
तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी तांदळाची नोंदणी ठेकेदाराकडे करतात. ही मागणी आल्यानंतर ठेकेदार एकत्रित ती शिक्षण संचालक कार्यालयाकडे देतो. यानंतर शासनाकडून तांदूळ जिल्ह्याच्या शासकीय गोदामात येतो. तेथून प्रत्येक शाळेत तांदूळ पोच करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. या प्रक्रियेला २० दिवसांचा कालावधी लागतो.
इंधन, भाजीपाल्याचे भागेना
शालेय पोषण आहारावरच बहुतांश विद्यार्थ्यांची मदार असते. परंतु जवळपास साडेसहाशे शाळांत पोषण आहारासाठीचा तांदूळ नसल्याने शाळांना खिचडी बनवता येत नाही. ही खिचडी शिजवण्यासाठी येणारा निधीही अत्यंत तुटपुंजा आहे.
या निधीतून इंधन आणि भाजीपाल्याचा खर्च मुख्याध्यापकांना करावा लागतो. ही खिचडी शिजवताना त्यांची ओढाताण होते. तांदूळ मिळत नसल्याने पालकांकडून शिक्षकांना जाब विचारला जातो. काहीजण वाद घालतात. त्यामुळे संबंधित शाळांवरील शिक्षक वर्ग वैतागला आहे.