पालकमंत्री मुश्रीफ काल नगरला आले, आज बाधित झाले; संपर्कात आलेल्यांचे टेन्शन वाढले

अमित आवारी
Friday, 18 September 2020

पालकमंत्र्यांच्या ट्विटमुळे संपर्कात आलेल्यांचे टेन्शन वाढले आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदही घेतली होती. आता जिल्ह्यात संपर्कात आलेल्यांची कुजबूज सुरू आहे.

नगर ः जिल्ह्यात कोरोनाने आपले हात-पाय पसरले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले होते. अशा स्थितीत काल (गुरुवारी) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर आज मुश्रीफ यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असता ते बाधित आढळून आले.

या संदर्भात त्यांनी स्वतःच सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी ट्विटर हँडलवरून माहिती दिली. त्यामुळे कालच्या बैठकीला हजर असलेल्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात गेल्या एक महिन्यांपासून पालकमंत्री आले नसल्याचे सांगत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व मनसेचे परेश पुरोहित यांनी चांगलेच टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी काल (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच अधिकारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील शिपाई व कार्यालयातील काही कर्मचारीही आहेत. अशा स्थितीत काल कोरोना आढावा बैठक झाली.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्‍त अशोक राठोड, महापालिका आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोरोना संदर्भातील चाचणी करून घेतली. त्यात ते बाधित आढळून आले. त्यांनी त्वरीत ट्विटरवरून वरील माहिती दिली. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचण्या करून घेण्याचे आवाहन केले आहे. माझी प्रकृती चांगली आहे. लवकरच मी सेवेत रूजू होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेतली होती. आता पुन्हा कोरोना चाचणी घ्यावी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे संपर्कात आलेल्यांचे टेन्शन वाढले आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदही घेतली होती. आता जिल्ह्यात संपर्कात आलेल्यांची कुजबूज सुरू आहे.

 

मुश्रीफ काल नगरला येऊन गेले असले तरी त्यांनी मास्क, हँडग्लोज घातलेले होते. सामाजिक अंतर ठेवून त्यांनी बैठक घेतली. त्यामुळे संपर्कातील लोकांनी काळजी करू नये, असे सूत्रांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Guardian Minister Mushrif Positive, increased tension with those who came in contact