Ahmednagar : भूमिअभिलेख कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक

Ahmednagar : भूमिअभिलेख कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

शेवगाव : जमिनीचा सुधारित नकाशा देण्याकरिता आठ हजारांची लाच स्वीकारताना शेवगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी प्रदीप शंकर महाशिकारे (वय ४६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सोमवारी (ता. १४) दुपारी ३ च्या दरम्यान करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी महाशिकारे यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अमरापूर (ता. शेवगाव) येथील ३१ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या आजोबांचे नावे अमरापूर शिवारात गट नंबर १८० मध्ये असलेल्या २१ गुंठे जमिनीची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेतली होती. मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यात आल्या होत्या.

त्याचा सुधारित नकाशा देण्याकरिता अभिलेख कार्यालयातील भूकरमापक वर्ग ३ भूमी अभिलेख कर्मचारी प्रदीप शंकर महाशिकारे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. आरोपी लोकसेवकाने तक्रारदार यास ताजनापूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान बोलावून ठरलेली आठ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली.

सहा महिन्यांत सहा जण चतुर्भुज

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव येथे गेल्या सहा महिन्यांत पाच ठिकाणी छापे टाकून सहा जणांविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये तहसील कार्यालयातील तीन कारवायांत चार जण, उपविभागीय पोलिस कार्यालयामध्ये एक, आज भूमी अभिलेख कार्यालयात एक अशा पाच ठिकाणच्या कारवायांत सहा कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.