
Ahmednagar : सणासुदीत लॉकडाउन उठवावे
श्रीगोंदे : सणासुदीच्या काळात तालुक्यातील लॉकडाउन उठवावे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याचा प्रशासनाचा दावा असल्याने काष्टी बंद केली. मात्र, प्रत्यक्षात बाहेरचे रुग्ण काष्टीतील दाखविल्याने गोंधळ झाला. त्यामुळे लॉकडाउन उठवावे, अशी मागणी करीत काष्टीतील चारशे व्यापारी आज तहसील कार्यालयापुढे उपोषणाला बसले होते.
''जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून वेळेत सवलत मिळते का हे पाहतो'' या प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनावर उपोषण स्थगित झाले. लॉकडाउनमुळे तालुक्यातील नऊ गावे बंद आहेत. दसरा- दिवाळी तोंडावर आल्याने व्यापारी या बंदमुळे मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच काष्टीतील व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवीत, गेल्या काही वर्षांतील सगळ्यात मोठे उपोषण तहसील कार्यालयापुढे केले. उपोषणात काष्टी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे, राकेश पाचपुते, वैभव पाचपुते, बंडू जगताप, राहुल पाचपुते, सुनील पाचपुते, महेश कटारिया, शहाजी भोसले, माऊली पाचपुते, किशोर बोगावत या प्रमुखांसह व्यापारी सहभागी झाले होते. उपोषणाला आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते यांनी भेट देत चर्चा केली.
काळे म्हणाले, की काष्टीतील बंदमुळे व्यापाऱ्यांसोबतच सामान्यांचे नुकसान झाले. कोरोनाचे अन्य ठिकाणचे रुग्ण काष्टीत दाखविले यात आमचा दोष नाही. प्रशासनाने त्यांच्या चुका सुधाराव्यात, आम्ही मदत करू. हातावर पोट असणाऱ्यांची जशी कोंडी झाली, तसेच कर्ज घेऊन व्यापार उभारणाऱ्यांचा कोंडमारा झाला आहे. प्रशासनाने समजून घेऊन मदत करावी.
प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार मिलिंद कुलथे, अप्पर तहसीलदार चारुशिला पवार चर्चेत होते. भोसले म्हणाले, की १३ ऑक्टोबरपर्यंत व्यापाऱ्यांनी मदत करण्याचे मान्य केले. सध्याच्या बंदमध्ये वेळेची काही सूट देता येते का, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. लोकांनी कोरोनाचे नियम पाळून लसीकरणातील सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.