नगरला भरली हुडहुडी, पारा आला तेरा अंशावर

दत्ता इंगळे
Monday, 7 December 2020

डिसेंबर महिना सुरू होताच, शहरात कडाक्‍याची थंडी जाणवू लागली आहे. सायंकाळी सात वाजेनंतर नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडतात.

नगर ः शहरात थंडीची लाट आली असून, पारा 13 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे बाजारात उबदार कपड्यांना मागणी वाढली असून, रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्याची उब घेत असल्याचे दिसून येते. 

डिसेंबर महिना सुरू होताच, शहरात कडाक्‍याची थंडी जाणवू लागली आहे. सायंकाळी सात वाजेनंतर नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडतात. सकाळी अगदी आठ वाजेपर्यंत थंडी जाणवते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शहरात जागोजागी नागरिक शेकोटी पेटवून बसल्याचे दिसते. सकाळी गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक जण भल्या पहाटेच घराबाहेर जॉंगिंगसाठी बाहेर पडत आहेत. 

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास मनाई केली असली, तरी थंडीमुळे रात्री नऊ वाजेनंतर कोणीही घराबाहेर पडणे टाळत आहेत. थंडीमुळे जिल्हा प्रशासनालाही कोणावरही कारवाईची वेळ येत नाही.

अत्यावश्‍यक काम असेल, तरच नागरिक रात्री घराबाहेर पडत आहेत. थंडीमुळे कोरोना प्रसार वाढण्याची भीती लक्षात घेता, जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ahmednagar, the mercury in the thermometer reached thirteen degrees