अहमदनगर : होमवर्कसाठी मोबाईल कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 mobile for homework

अहमदनगर : होमवर्कसाठी मोबाईल कशाला?

अहमदनगर : कोरोना काळात मुलांसाठी घेतलेले मोबाईल त्यांनाच देण्यात आले. आता ऑफलाइन शिक्षण झाले, तरीही ते मोबाईल मुलेच वापरतात. त्यावरून अभ्यासाच्या नावाखाली एकमेकांशी चॅटिंग, गेम खेळणे, असे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. काही शाळांकडूनही गृहपाठ मोबाईलवर दिला जात असल्याने, मुलांचे ते हक्काचे खेळणे बनले आहे. परिणामी, अनेक मुलांवर मानसिक दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

गृहपाठ मोबाईलवर येत असल्याने विद्यार्थ्यांना मोबाईल लागतो, असे पालक सांगतात. मात्र, मुले त्याचा गैरवापर करतात. व्हॉट्‌सॲप, स्नॅप चॅट आदींचा वापर करून विद्यार्थ्यांचे चॅटिंग सुरू असते. गेम खेळतात. यु-ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात वेळ घालतात. मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. मोबाईलमुळे अनेक घरांतील मुले चिडचिडी झाली आहेत. त्यावरून घरात तंटे सुरू झाले आहेत. विशेषतः दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास पूर्णपणे बंदी असायला हवी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. दरम्यान, ग्रामीण भागातही मुले मोबाईलसाठी हट्ट करीत असून, त्यामुळे कुटुंबाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. इंटरनेटचाही दरमहा खर्च वाढत आहे.

असे होतात दृष्परिणाम

मुले एकमेकांशी चॅटिंगमध्ये वेळ घालतात

पालकांना माहिती होऊ नये म्हणून चॅट डिलिट करतात

अभ्यासाकडे दुर्लक्ष होते

मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला

मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशनाची गरज वाढली

मुले हट्टी बनली

हे आहेत उपाय

विद्यार्थ्यांनी शाळेत मोबाईल न वापरण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढावेत

प्रत्येक शाळेत विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशक असावेत

शिक्षकांनी गृहपाठ मोबाईलवर देऊ नयेत

मुलांकडे असलेले मोबाईल पालकांनी वारंवार तपासावेत

कोरोना काळात मोबाईल वापरण्यास परवानगी होती. आता ऑफलाइन शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र मोबाईल देऊ नये. शिक्षकांनीही गृहपाठ व्हॉट्‌स ॲपवर टाकू नयेत. शाळेत मुलांना मोबाईल वापरता येणार नाही अशा सूचना संस्थांनीही द्याव्यात. 

- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल दिले जात असल्याने ते गेमिंगच्या आहारी जात आहेत. असे विद्यार्थी मानसिक आजाराकडे वळतात. चिडचिडी होतात. अशा रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रसंगी त्यांना औषधे व समुपदेशनाची गरज पडते. हे वेळीच थांबायला हवे.

- डॉ. नीरज करंदीकर, मानसोपचारतज्ज्ञ

ऑनलाइन शिक्षण सुरू असताना पर्याय नव्हता; परंतु पूर्वीपासून शिक्षकांनी वर्गातच गृहपाठ देणे व दुसऱ्या दिवशी तपासणे आवश्यक आहे. तो मोबाईलवर देणे योग्य नाही. पालकांनीही मोबाईलचा लाड करू नये. मुले मोबाईलपासून कशी दूर राहतील, याची काळजी शिक्षकांनी घ्यायला हवी. शिक्षक-पालकांचे व्हॉट्‌स ॲप ग्रुप असणे योग्य नाही. मोबाईलच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे.

- संजय कळमकर, शिक्षणतज्ज्ञ

Web Title: Ahmednagar Mobile For Homework Smart Phone Side Effects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..