नगरची महापालिका लागली घनकचरा व्यवस्थापनाच्या तयारीला

अमित आवारी
Thursday, 24 December 2020

आता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश श्रीकांत मायकलवार यांनी दिला. 

नगर : स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात यश संपादन करण्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, महापालिका कर्मचाऱ्यांनी घरगुती कचऱ्याचे विलगीकरण करुन कंपोस्ट तयार करण्याचे नियोजन करावे, असा आदेश महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी काढला. 

घनकचरा व्यवस्थापना संदर्भात आयुक्‍त मायकलवार यांनी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्‍त संतोष लांडगे, सचित राऊत, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख राहिदास सातपुते उपस्थित होते. 

आयुक्‍त मायकलवार म्हणाले, की सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर तसेच अस्वच्छता पसरविणाऱ्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी. यांच्यावर आता महापालिका ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

आता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश श्रीकांत मायकलवार यांनी दिला. 

शहरातील दैनंदिन कचरा उचलला जात आहे. परंतु, ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण होत न नसल्याने त्यावर प्रक्रीया करणे व विल्हेवाट लावणे अवघड होत असल्याने यावर मनपाने लक्ष केंद्रीत केले. त्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांपासून घरगुती कंपोस्ट खत प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation started preparing for solid waste management