Ahmednagar : नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या वाढली, लंकेबरोबर इतर नावे चर्चेत Ahmednagar Nagar Dakshin Lok Sabha seat NCP aspirants Arun Jagtap, Ghanshyam Shelar, Dadabhau Kalamka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके

Ahmednagar : नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या वाढली, लंकेबरोबर इतर नावे चर्चेत

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. या पारंपरिक मतदारसंघातील जागेवर लढण्यासाठी पक्षातून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार अरुण जगताप, घनश्याम शेलार, दादाभाऊ कळमकर यांचीही नावे पुढे आली आहेत.

अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक घेण्यात आली. तीत अहमदनगरसह कोल्हापूर, साताऱ्यासह अन्य मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची चाचपणी केली असता वरील नावे समोर आली. या मतदारसंघातील नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीस अहमदनगर जिल्ह्याचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, घनश्याम शेलार, अंबादास गारूडकर, राजेंद्र कोठारी आदी उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत हा मतदारसंघ नेहमीच राष्ट्रवादीकडे राहिला. गेल्या काही निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने येथे मुसंडी मारली आहे.

मात्र, राष्ट्रवादी येथे सातत्याने तगड्या उमेदवाराच्या शोधात राहिली. मागील निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांनी भाजपच्या सुजय विखे यांच्याविरुद्ध लढत दिली. ऐन वेळी ही उमेदवारी दिली गेली.

हा अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यातील नेत्यांनी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याचा आग्रह धरला. यावर पक्षश्रेष्ठींनीही सहमती दर्शवली.

बँकेतील सत्तांतरनाट्याची चर्चा

ही बैठक लोकसभा निवडणूक उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर बोलावली असली, तरी काही नेत्यांनी जिल्हा बँकेत झालेल्या दगाफटक्याचा मुद्दा उपस्थित केला. उमेदवारांच्या नावांची चाचपणी करताना हाही मुद्दा चर्चिला जावा, असे जिल्ह्यातील काही नेत्यांना वाटत होते. मात्र, या विषयावर चर्चा झाली नाही. वरिष्ठ नेत्यांनी त्या मुद्द्याला बगल दिली.

लंके, रोहित पवार अनुपस्थित

आमदार नीलेश लंके यांचे नाव या मतदारसंघात आघाडीवर आहे. मात्र, त्यांना घरातील लग्नकार्यामुळे उपस्थित राहता आले नाही, तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हेही चौंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही.