
तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांची आवडती पेठ असलेली संगमनेरची बाजारपेठ पुन्हा कात टाकून नव्याने फुलली आहे.
संगमनेर ः दिवाळी सण तोंडावर येवून ठेपला आहे. सहकारी साखर कारखाना व दुधाच्या रिबेटसह शेतकरी व दुग्धोत्पादकांच्या हाती चलन उपलब्ध झाल्याने सणाच्या खरेदीसाठी शहरात गर्दी उत्तरोत्तर वाढत आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांनी साडेचार हजारांचा टप्पा गाठला असून, यात शहरापेक्षा तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या पुन्हा आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय ठरत आहे.
तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांची आवडती पेठ असलेली संगमनेरची बाजारपेठ पुन्हा कात टाकून नव्याने फुलली आहे. शहरातील नामांकित कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल, मोबाईल, विजेवरील घरगुती उपकरणे, फराळाचे पदार्थ आदींच्या विक्रीची दुकाने गर्दीने फुलली आहेत.
त्यातच साखर कारखाना व शहरातील बँका, पतसंस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू घेण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनता दररोज शहरात येत आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोनामुळे बाजारपेठेवर आलेली अवकळा हटली असून, नव्या जोमाने हॉटेल, उपहारगृहे, रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सुरु झाल्या आहेत.
थंडीही वाढल्याने कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. या महिन्याच्या सुरवातीपासून दररोज सुमारे 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यांची संख्या शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे.
सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठणार्या कोविड बाधितांच्या संख्येला गेल्या महिन्यात ओहोटी लागल्याने कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे कोविडमुक्तीच्या संगमनेरकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. शहरी रुग्णसंख्या आत्तापर्यंत पूर्णतः नियंत्रणातच आहे, मात्र त्याचवेळी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे.
काल सायंकाळपर्यंत तालुक्याची रुग्णसंख्या 4 हजार 474 वर पोचली आहे. ऑगस्टमध्येही सण-उत्सवाला बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने शेवटच्या आठवड्यासह संपूर्ण सप्टेंबरमध्ये कोविडने तालुक्याच्या सर्वच भागात थैमान घातले होते. तशीच स्थिती यावेळीही निर्माण होत आहे. खरेदीसाठी बाहेर पडतांना नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष व बेफिकीरीमुळे स्थिती अनियंत्रित होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी शासकिय नियमांचे पालन करावे. प्रत्येकाने मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन करतानाच, या काळात मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर