Ahmednagar : कांदा लिलाव बंद ; शेतकरी संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar

Ahmednagar : कांदा लिलाव बंद ; शेतकरी संतप्त

नगर : दोन दिवस झालेल्या कांदा लिलावात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी तीन ते साडेतीन हजार रूपयांचा दर मिळाला. परंतु सोमवारी (ता.३१) झालेल्या लिलावात अवघा एक हजार ते अठराशे रूपयांचा दर मिळाला. अचानक दर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. आंदोलनानंतर तब्बल बाराशे रुपयांपर्यत दरात वाढ करण्यात आली.

नेप्ती उपबाजारात सोमवारी ८५ हजार कांदा गोण्याची आवक झाली होती. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (ता. ३१) झालेल्या कांदा दरात तफावत आढळून आली. नेप्ती उपबाजारात सध्या अहमदनगरसह पाच जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी येत आहे. राहुरी, शिरूर, नेवासे, लासलगाव या ठिकाणी शनिवारी व रविवारी झालेल्या कांदा लिलावात सरासरी तीन ते साडे हजार रूपयांच्या दराने कांदा विक्री झाली. त्या तुलनेत नेप्ती सोमवारच्या लिलावात एक हजार ते अठराशे रूपयांपर्यंतच बाजारभाव काढण्यात आला. इतर बाजार समितींचे दर आणि नेप्ती उपबाजारातील दराची मोठी तफावत लक्षात आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी आडते व व्यापाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कांदा लिलाव बंद पाडला.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, तालुका उपप्रमुख प्रकाश कुलट व नगरसेवक लिखील वारे यांनी शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली. दरात मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. शेतकऱ्यांनी दरातील तफावत आडते व व्यापाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तोपर्यंत सर्व कांदा लिलाव बंदच होते. दीड तास हे आंदोलन सुरू होते. बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सहसचिव सचिन सातपुते, संजय काळे यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. अखेर संदेश कार्ले व निखिल वारे यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना सरासरी तीन ते साडेतीन हजार रूपयांचा दर मिळाला.

वारे यांच्‍या मध्यस्‍थीनंतर लिलाव सुरू

शेतकऱ्यांनी तब्बल दीड तास कांदा लिलाव बंद पाडला. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत लिलाव सुरू करण्यास परवानगी दिली. वारे यांच्या मध्यस्‍थीमुळे बंद पडलेला लिलाव पुन्हा सुरू झाला. तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

दराची तफावत कशामुळे?

सोमवारी सुरुवातील व्यापाऱ्यांनी कांद्यास अवघा एक हजार ते अठराशे रुपये भाव काढला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. आंदोलनानंतर सुरुवातीच्या दरात तब्बल बाराशे रुपयांची वाढ करण्यात आली. ही तफावत सुरुवातील कशामुळे करण्यात आली याचा प्रशासनाने शोध घेणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे.

शेतकऱ्यांनी कांदा लिलाव काही वेळेपुरता बंद पाडला होता. त्यांची मागणी आम्ही ऐकूण घेतली. आडते आणि व्यापाऱ्यांनी सोशल मिडीयावर परस्पर दर जाहीर करू नयेत, अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यापुढे असा प्रकार घडणार नाही, यासाठी आम्ही दक्षता घेऊ.

- अभय भिसे, सचिव, बाजार समिती, अहमदनगर

अतिवृष्टीने चाळीतील कांदा निम्म्यापेक्षा अधिक पावसाने खराब झाला आहे. उरलेल्या मालावर बाजार समितीमधील आडते डल्ला मारत आहेत, अशा आडत्यांवर तातडीने कारवाई करावी.

- संदेश कार्ले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख