Ahmednagar : राहुरीतील पतसंस्थेत सात कोटींचा अपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहार

Ahmednagar : राहुरीतील पतसंस्थेत सात कोटींचा अपहार

राहुरी : राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत ७ कोटी ३७ लाख ६२ हजार ७८ रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १४) संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, कर्मचारी व तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.

कारभारी बापूसाहेब फाटक (व्यवस्थापक, रा. टाकळीमियाँ), भाऊसाहेब तुकाराम येवले (अध्यक्ष, रा. राहुरी), शरद लक्ष्मण निमसे ( उपाध्यक्ष, रा.सह्याद्री नर्सरी, अस्तगाव, ता. राहाता), सुनील नारायण भोंगळ (लेखनिक तथा वसुली अधिकारी तथा दैनिक बचत प्रतिनिधी, रा. जोगेश्वरी आखाडा), उत्तम दत्तात्रेय तारडे (लेखनिक तथा कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. केंदळ बुद्रुक), सुरेखा संदीप सांगळे (लेखनिक तथा कॅशिअर, रा. राहुरी), सुरेश मंजाबापू पवार (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. जोगेश्वरी आखाडा), दत्तात्रेय विठ्ठल बोंबले (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा.सावेडी, अहमदनगर), दीपक संपतराव बंगाळ (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक संजय पांडू धनवडे (वय ३७, रा. सोनई) यांनी फिर्याद दिली. एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान कालावधीच्या लेखापरीक्षणात राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार ७८ रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक करून अपहार झाला आहे. त्यात वरील नऊ आरोपी सहभागी आहेत.

पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत. ठेवीदारांचे पैसे अडकल्याने संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध ठेवीदारांनी राहुरीच्या सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयासमोर आंदोलने करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.