Ahmednagar : नागालँडचे आमदार ‘रिपाइं’च्या अधिवेशनात Ahmednagar Repain session Nagaland MLA North-East in-charge Vinod Nikalje | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार ए लिमा वन चांग

Ahmednagar : नागालँडचे आमदार ‘रिपाइं’च्या अधिवेशनात

शिर्डी : राज्याच्या विधानसभेत अद्यापही खातेही उघडू न शकलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नागालँडमध्ये मात्र दोन आमदार विजयी झाले. ईशान्य भारतात हा पक्ष रुजविण्याची जबाबदारी स्वीकारलेले मुंबईतील युवा कार्यकर्ते विनोद निकाळजे यांच्या कामगिरीचे हे फलीत समजले जाते. नागालँड येथील हे दोघे आमदार ए लिमा वन चांग आणि लिमटिचाबा चांग पक्षाच्या अधिवेशनास काल (शनिवारी) उपस्थित राहाण्यासाठी येथे आले आहेत.

पक्षाच्या या कामगिरीबाबत ‘सकाळ’शी बोलताना निकाळजे म्हणाले की, सात वर्षांपूर्वी आठवले यांनी समता यात्रा काढली. पहिल्या सतरा हजार किलोमीटर अंतरावर मी त्यांच्या सोबत होतो. गुवाहाटीत आमच्या पक्षाचे अस्तित्व नाही. त्यामुळे मोजके लोक स्वागताला आले. रात्री त्यांच्या सोबत चर्चा करताना आठवले यांनी ईशान्य भारतात पक्ष रुजविण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवीली.

त्यावेळी भेटायला आलेल्या दोन-चार लोकांना सोबत घेऊन मी चाचपणी सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शक्य होईल तसे पोचविण्याची तयारी सुरू केली. महिन्यातले पंधरा ते वीस दिवस मी तिकडे असायचो. अद्यापही दौरे करतोच आहे. भाषेची मोठी अडचण होती. इंग्रजी आणि हिंदी भाषा समजणाऱ्या मंडळींसोबत संवाद सुरू केला.

हळूहळू कार्यकर्ते मिळाले, प्रचार आणि प्रसार सुरू झाला. आसामसह सात राज्यांत आता बऱ्याच ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत नागालँडमध्ये पक्षाने आठ उमेदवार उभे केले. त्यातील दोन विजयी झाले. हे दोघे आमदार कार्यकर्तेच होते. त्यातील एक बेचाळीस आणि दुसरा तेहेतीस वर्षांचा आहे. पक्षाने थेट ईशान्य भारतात खाते उघडले.

आमचे मार्गदर्शक आठवले यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबई आणि दिल्लीत जल्लोष साजरा केला. आमचे आणखी दोन उमेदवार अवघ्या दीडशे मतांनी पराभूत झाले. पक्षाच्या अधिवेशनास हे दोघे आमदार आवर्जून उपस्थित आहेत.

नागालँडमध्ये दोन जागी मिळालेला विजय हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोबत घेऊन निघालेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. रिपब्लिकन पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवून जिंकू शकतो, हे आम्ही दाखवून दिले.

विनोद निकाळजे,

ईशान्य भारत प्रभारी, रिपाइं (आठवले गट)