
Ahmednagar : शरद पवार यांच्या हस्ते आज सायकलींचे वाटप
पारनेर : आमदार नीलेश लंके यांच्या उद्या (ता. १०) निघोज येथे होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील दुर्गम भागातील व पायी शाळेत येणाऱ्या सात हजार विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
आमदार लंके यांचा १० मार्चला वाढदिवस आहे. त्यानिमित्त शालेय मुला- मुलींना सायकलींचे वितरण करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून कोणत्याच कार्यक्रमात लंके सत्कार स्वीकारत नाहीत. सत्कारावर होणाऱ्या खर्चाऐवजी शालेय साहित्य द्या, असा आग्रह करतात. हे शालेय साहित्य गरजू शालेय मुलांना वाटप करतात.
यावेळी देवीभोयरेतील प्रवेशद्वाराचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर (कै.) बाबासाहेब कवाद यांनी स्थापन केलेल्या निघोज नागरी पतसंस्थेचे नामकरण, संस्थेने बांधलेल्या इमारतीचेही लोकार्पण होत आहे. तसेच निघोज येथे राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या दीड कोटी खर्चाच्या अभ्यासिकेचेही खासदार पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
त्यानंतर आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते आमदार लंके यांचा सन्मान होणार आहे. येथे सायकलींचे वितरण व सभा होत आहे.